भातकुली शासकिय रुग्णालयात दारुड्याचा गोंधळ
डॉक्टरांना शिवीगाळ, सुरक्षा रक्षकाला धक्काबूक्की

अमरावती / 24 जुलै: एका दारुड्याने मद्यधुंद अवस्थेत भातकुलीच्या शासकिय रुग्णालयात पोहोचून चांगलाच गोंधळ घातल्याची घटना बुधवारी सायंकाळी चांगलाच गोंधळ घातला. डॉक्टरांना शिवीगाळ करण्यासोबतच त्याने सुरक्षा रक्षकाला धक्काबूक्की केली आणि रुग्णालयातील साहित्यही फेकून दिले. रुग्णांनाही त्याने चांगलाच त्रास दिला. याप्रकरणी भातकुली पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
धम्मपाल हरिदास शेजव (35, रा. निंभा, भातकुली) असे आरोपीचे नाव आहे. धम्मपाल बुधवारी सायंकाळी मद्यधुंद अवस्थेत भातकुली सरकारी रुग्णालयात पोहोचला. कारण नसताना रुग्णांना त्रास देण्यास त्याने सुरुवात केली. रुग्णालयातील टेबल, खुच्या आणि अन्य साहित्यांची फेकफाक करुन त्याने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी ड्यटीवर असलेले डॉक्टर आणि कर्मचार्यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही त्याने लोटलाट केले. डॉ. शुभम दिपप्रकाश तुरकाने (24) यांची कॉलर पकडून धम्मपालने मारण्याची धमकी दिली. सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता धम्मपाल याने त्याला धक्काबूक्की करुन शिवीगाळ केली. डॉ. शुभम तुरकाने यांच्या तक्रारीवरुन भातकुली पोलिसांनी आरोपी धम्मपाल शेजव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.




