खबरदार…कुठेही कचरा टाकू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई
मनपा आयुक्त सौम्या शर्मांचा सज्जड इशारा

-अमरावती कचरामुक्त करण्यासाठी मोहिम
अमरावती / 26 जून: अमरावतीकरांनो, कचरा हा कचरा पेटीतच टाका. शहरात सार्वजनिक ठिकाणी, पुलावरून कचर्याने भरलेल्या पिशव्या भिरकावल्या तर तुम्हाला दंड झालाच म्हणून समजा, असा सज्जड इशारा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी दिला आहे. शहरातील अस्वच्छतेचे चित्र बदलण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा महानगरपालिकेने उगारला आहे. त्यामुळे शहरात वाटेल तिथे कचरा टाकाल तर दंड करण्याचे निर्देश आयुक्त सौम्या शर्मा यांनी दिले आहे.
पुलावरून, रस्त्याचा एखादा कोपरा पाहून, धार्मिक स्थळाचा परिसर, भाजी मंडई, उद्यान, बस थांबा किंवा कोणत्याही स्वरूपाचे सार्वजनिक ठिकाण दिसताच कचर्याने भरलेल्या पिशव्या रिकाम्या केल्या जातात. काही जण तर कचर्याच्या पिशव्या हवेतून भिरकावून देतात. या सगळ्यांवर त्याच वेळी दंडात्मक कारवाई करण्याचा पवित्रा आता प्रशासनाने घेतला आहे. कचर्यातून निर्माण होणार्या आरोग्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. सौम्या शर्मा यांनी या कचर्याचा दूरगामी परिणाम जैवविविधतेवर, आरोग्यावर होत असल्याचे ठळकपणे मांडले होते. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी शहरातही स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आता सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
काही बेजबाबदार नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता केली जाते. असे करणार्यांवर कारवाई अधिक कडक केली जाणार आहे. प्रत्येक नागरिकाने आपले शहर अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण घर स्वच्छ ठेवण्याकडे कधी दुर्लक्ष करत नाही, मग शहरदेखील स्वच्छ ठेवण्याची आपली जबाबदारी आहे. काही नागरिकांमुळे शहरात अस्वच्छता निर्माण होत असेल, तर त्यांनीही आपल्या सवयींमध्ये बदल केला पाहिजे, असे महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी सांगीतले आहे. याच अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने आज गुरुवारी हमालपुरा रोडवरील तीन कचरा पॉट साफ करण्याची कार्यवाही करण्यात आली.
-खाजगी जागेत कचरा, मालकांना नोटिसा
कचर्याचे क्रॉनिक स्पॉट कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयन्न करीत असतांनाच खासगी जागांवरील कचरा उचलण्याची वेळ आली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता जागा मालकांना नोटीस दिली जाणार आहे. सातत्याने एकाच ठिकाणी कचरा टाकण्यात येणारी ठिकाणे कचरामुक्त करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. काही ठिकाणे कचरामुक्त करण्यात आली आहे. खासगी मोकळ्या जागेत टाकला जाणारा कचरा हा मनपासाठी डोकेदुखी ठरत आहे. अशा खासगी जागेत मोठ्या प्रमाणावर कचर्याचे ढीग साचून त्याला आग लागणे, कुजून दुर्गंधी सुटणे अशा समस्या निर्माण होतात. यातून मार्ग काढण्यासाठी आता महानगरपालिकेने संबंधित जागा मालकांना नोटीस देण्याचा निर्णय घेतला आहे.




