शेतकर्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन
विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली

मुंबई /3 जुलै: शेतकर्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी सलग दुसर्या दिवशी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. तीन महिन्यांत राज्यात 767 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. बैल नाही म्हणून शेतकर्याला स्वत:ला जोताला जुंपून घ्यायची वेळ आली आहे. कर्जमाफी देऊ म्हणून सत्तेत आलेले सरकार आता हे ओशासन विसरले, असा हल्लाबोल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवारयांनी केला. आम्ही स्थगनप्रस्ताव दिला आहे, तेव्हा आताच चर्चा करा, असा आग्रह विरोधकांनी धरला. त्यावर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांनी प्रस्ताव आणावा, मी चर्चेला पूर्ण दिवस द्यायला तयार आहे, असे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, तत्काळ चर्चेची मागणी मान्य न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.शेतकर्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे, शेतकर्यांना मदत करणे, ही सरकारची जबाबदारी असून आमचे सरकार ती पार पाडेलच. मात्र, विरोधकांनी शेतकर्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट मांडली.विजय वडेट्टीवार म्हणाले की, कृषिमंत्री शेतकर्यांना भिकारी म्हणतात, माजी मंत्री बबनराव लोणीकर शेतकर्यांबाबत आक्षेपार्ह विधान करतात. शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीआधी कर्जमाफी करू, अशी घोषणा केली होती. आता मात्र सरकार समितीला पुढे करत आहे.




