बच्चू कडूंच्या मुठीला ठाकरेंचे बळ
कर्जमाफीच्या मुद्यावर एकत्र येण्याची शक्यता

मुंबई /4 ऑगस्ट : गेल्या काही महिन्यांपासून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकर्यांसाठी लढा उभा केला आहे. शेतकर्यांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी बच्चू कडू आणि शेतकरी आंदोलन करत आहेत. निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकर्यांचा सात बारा कोरा करू असं ओशासन दिले होते परंतु सत्तेत येऊन 10 महिने उलटले तरीही सरकारने अद्याप शेतकरी कर्जमाफी केली नाही. त्यामुळे आता आक्रमक झालेल्या कडू त्यांचा हा लढा आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. परंतु, त्याआधी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. येत्या बुधवारी, 6 ऑगस्टला ते मनसे अध्यक्षांची भेट घेणार आहेत. शेतकरी कर्जमाफी आणि इतर मुद्द्यांसाठी बच्चू कडू मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिला होता. मनसे नेते बाळा नांदगावकर हे कडूंनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी या आंदोलनात सहभागी झालेल्या नांदगावकरांनी म्हटले होते की, बच्चू कडू यांनी शेतकर्यांसाठी दिंडी काढलेली आहे. सातबारा कोरा होण्यासह आणखीही काही त्यांच्या मागण्या आहेत. त्यासाठी आपल्या पक्षातर्फे त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना मी आंदोलनात सहभागी होण्यासाठी तत्काळ होकार दिला. राज ठाकरे मला म्हणाले की, केवळ पाठिंबा देऊ नको, तर तू स्वतः त्या ठिकाणी जा. बच्चू कडू यांच्या दिंडीत सहभागी होऊन शेतकर्यांना निरोप दे की, त्यांच्या प्रत्येक लढ्यात आम्ही सोबत आहोत. कुठूनही पैसे आणा पण शेतकर्यांचा सातबारा कोरा करा, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले होते. महत्त्वाची बाब म्हणजे, शनिवारी (ता. 2 ऑगस्ट) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. या मेळाव्यात त्यांनी भाषण सुद्धा केले. तर, शेतजमिनी विकू नका, असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकर्यांना केले होते. उद्योगातमराठी माणसांना भागीदारी द्या असा मुद्दा सुद्धा त्यांनी या कार्यक्रमात मांडला होता. शेकाप पक्षाच्या दुसर्या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी लाल झेंड्याच्या व्यासपीठावर 2 भगवे झेंडे आले आहेत, असे विधानही राज ठाकरे यांनी केले होते. पण आता शेतकर्यांसाठी लढा उभारणारे बच्चू कडूच राज ठाकरेंची भेट घेणार असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर या दोन्ही नेत्यांमध्ये नेमके काय बोलणे होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




