आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न

अश्लील फोटो पाठवून खंडणी मागितली, ठाणे पोलिसात गुन्हा दाखल

ठाणे /9 ऑक्टोबर : राज्यातील एका सत्ताधारी पक्षाशी संबंधित आमदारासोबत हनी ट्रॅपचा प्रकार उघडकीस आला आहे. आमदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना अश्लील छायाचित्र पाठवून पैसे उकळण्याचा आणि त्यांची राजकीय कारकीर्द संपविण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणी ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000-67 आणि भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 चे कलम 308 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदारांनी स्वतः याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, त्यानुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, 2024 मध्ये ते विधानसभा मतदारसंघात असताना त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरून एक महिला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. सुरुवातीला त्यांनी या कॉलकडे दुर्लक्ष केले, परंतु वारंवार संपर्क होण्यामुळे काही वेळाने कॉल उचलला. त्यावेळी महिलेनं त्यांच्यासोबत मैत्री करायची इच्छा व्यक्त केली आणि वारंवार संपर्क साधत राहिली. अखेर आमदारांनी तिला ब्लॉक केले.

2024 मध्ये विधानसभा निवडणूक लढविण्याचे ठरवल्यानंतर त्या महिलेनं दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रचारादरम्यान व्यस्त असताना तिने दररोज अश्लील छायाचित्र पाठवू लागली. आमदारांनी तिला नकार दिला असता, ती त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी देऊ लागली.

* अखेर आमदारांचीपोलीस ठाण्यात तक्रार 

सुमारे महिन्याभरापूर्वी महिलेनं पुन्हा एकदा आमदारांना वेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर तिने अश्लील छायाचित्र पाठवून पाच ते दहा लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार आमदारांच्या राजकीय कारकीर्दीस हानी पोहोचविणारा असल्याने त्यांनी तात्काळ याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button