पुण्यात 19 ठिकाणी एटीएसचे छापे

अनेक संशयित दहशतवादी ताब्यात

* इसिसला दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारल्या प्रकरणी कारवाई

पुणे /9 ऑक्टोबर : इसिसला दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारल्याप्रकरणात व राष्ट्रविरोधी कारवाई केल्याप्रकरणात पुण्यात 19 ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) छापेमारी करत काही जणांना ताब्यात घेतले. यावेळी कोंढवा आणि इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात डिजिटल साहित्य जप्त करण्यात आले तसेच इसिसच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. बुधवारी रात्री मध्यरात्रीपासून पुणे पोलिसांच्या तब्बल 25 हून अधिक पथकांच्या मदतीने एटीएसने ही छापेमारी केली. एटीएसने जून-जुलै महिन्यात सातार्यात दहशतवाद्यांनी साडी दुकानाची लूट केलेल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यात अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत काहींची नावे समोर आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे एटीएसने एका मेसेजद्वारे स्पष्ट केले. बुधवारी (दि.8) रात्री मध्यरात्रीपासून गुरूवारी (दि.9) सायंकाळी सहावाजेपर्यंत चाललेल्या कारवाईत कोणाला ताब्यात घेतले गेले याची माहिती अद्याप स्पष्ट केलेली नाही. सातार्यातील दरोडा करून चोरलेल्या रकमेपैकी काही रक्कम संशयित इसिसच्या दहशतवाद्यांनी बॉम्ब साहित्य खरेदी करण्यासाठी वापरल्याची माहिती तपासात समोर आली होती. एप्रिल 2023 मध्ये झालेला हा दरोडा दहशतवादी कारवायांच्या निधी उभारणीसाठी करण्यात आलेले असल्याचे तपासातून स्पष्ट झाले. त्यानुसार एटीएसने 7/2023 हा गुन्हा नव्याने नोंदवला असून त्याचा तपास पुणे एटीएस करत आहे. आत्तापर्यंत या दरोडा प्रकरणात चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या तपासात सातार्यातील दरोड्याचे इसिसशी संबंधही उघड झाले आहेत. या प्रकरणात आत्तापर्यंत पुण्यातील इसिस मोड्युल प्रकरणात सहभागी असलेले दहशतवादी मोहम्मद शहानवाज आलम शफीउमा खान उर्फ इब्राहीम उर्फ प्रिन्स (वय 32, झारखंड), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ छोटु (वय 27, कोंढवा, मूळ रतलाम, मध्यप्रदेश), जुल्फिकार अली बरोडावाला उर्फ लाला उर्फ लालाभाई (वय 44, बोरीवली, राहुर पडगा, भिवंडी, मूळ बरोडा, गुजरात) आणि जून महिन्यात तलाह लियाकत अली खान (वय 37, कोंढवा) यांना मुंबईतील कारागृहातून सातार्यातील दरोड्यात सहभागाच्या कारणावरून अटक करण्यात आली होती.

 

संबंधित बातम्या

Back to top button