संजय राठोड यांच्या खात्यात पैसे घेउन अधिकार्यांची नियुक्ती
भाजप आमदाराचा गंभीर आरोप

-संदीप जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र
-राज्याच्या राजकारणात पून्हा खळबळ
मुंबई / 22 मे: महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जाणार्या भाजप आमदार संदीप जोशी यांनी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा गंभीर स्वरुपाचा आरोप केला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे महायुतीतील मित्रपक्षाच्या एका आमदारानं थेट सरकारमधील मंत्र्यांवर आरोप केल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संदीप जोशी यांनी याबाबतचं एक पत्रही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. यामुळे राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारच्या मृद व जलसंधारण विभागात अधिकार्यांची पैसे घेऊन नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप करत संदीप जोशी यांनी विदर्भासह महाराष्ट्राचंही राजकारण तापवलं आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी तब्बल आठ अधिकार्यांची बेकायदेशीर नेमणूक करण्यात आल्याचा ठपका ठेवला आहे.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी यावेळी उपविभाग जलसंधारणाच्या तब्बल 375 अधिकार्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही केला आहे. अधिकार्यांची नियुक्ती करण्यासाठी पैशांचा व्यवहार 100 टक्के झाला ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचंही म्हटलं आहे. तसेच याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. भाजप आमदार संदीप जोशी म्हणाले, ज्यावेळी जेव्हा शासकीय निर्णय स्पष्ट असतात तेव्हा कुठलातरी मार्ग काढून स्वत:च्या बदल्या करण्यासाठी वेगवेगळे मार्ग निवडत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
यापूर्वी राजीनामा देण्याची नामुष्की…
टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अखेर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला होता. बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 23 वर्षीय पूजा चव्हाणच्या मृत्यूमध्ये संजय राठोड यांच्यावर सहभाग असल्याचा आरोप झाला होता. पण नंतर पुणे पोलिसांनी त्यांना याप्रकरणी क्लीन चिट दिली होती.