अंजनसिंगीच्या गुरुमंदिरात चांदीच्या पादुकांची चोरी
दानपेटीही फोडली, ऐजव लंपास

कुर्हा / 24 जुलै: कुर्हा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंजनसिंगी येथे असलेल्या प्रसिद्ध गुरुमंदिरात बुधवार, 23 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील चांदीच्या पादुका लंपास केल्या. तसेच दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कमेवरही हात साफ केला. एकुण 29 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे सांगण्यात आले.
अंजनसिंगी येथे श्रीमद सद्गुरु परमहंस श्रीनिवास शास्त्री मंदिर संस्थानचे गुरुमंदिर असून हे मंदिर पंचक्रोशीतील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. बुधवारी रात्री मंदिर बंद झाल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करुन चांदीच्या पादुका आणि दानपेटीतील रक्कम चोरुन नेली. सकाळी साडेसहा वाजता पुजारी मंदिरात आले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ याबाबत अमरावती येथे राहणारे मंदिराचे विश्वस्त अशोक त्र्यंबकराव जोशी यांना सुचना दिली.
जोशी यांनी सकाळी कुर्हा पोलिस ठाण्यात या चोरीच्या घटनेची तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांचा शोध पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.




