अमरावतीकरांना अभिमान वाटावा असे कार्य करणार
सरन्यायाधीश भूषण गवई यांचे उद्गार

-नेत्रदीपक सोहळ्यात भव्य सत्कार
-अमरावती वकिल संघातर्फे आयोजन
-शहरवासीयांच्या प्रेमाने भारावले न्यायमूर्ती
अमरावती / 25 जून : मी याप्रसंगी भारताचा मुख्य न्यायाधीश म्हणून नाही तर अमरावतीचा पूत्र या नात्याने येथील मातीला वंदन करण्यासाठी आणि अमरावतीमधील लोकांचे आशिर्वाद घेण्याकरिता उपस्थित आहे. 22 वर्षाच्या न्यायमूर्तीपदाच्या कालखंडात बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं जी मूल्य दिलीत त्यानुसार मी कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही आर्थिक, सामाजिक न्यायाकरिता समता, बंधूता या संविधानिक मूल्यांशी बांधील राहून वाटचाल करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. अमरावतीकरांना अभिमान वाटावा, असे कार्य या अमरावतीकर सुपूत्रकडून घडेल, असे उद्गार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काढले.
अमरावती वकिल संघातर्फे आयोजित भव्य आणि नेत्रदीपक सोहळ्यात आज न्यायमूर्ती भूषण गवई यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना गवई बोलत होते. पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विवेकानंद सभागृहात आज बुधवारी, सायंकाळी पार पडलेल्या या सोहळ्यात न्यायपालिकेच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेले अमरावतीकर सुपूत्र भूषण गवई यांच्या सन्मानासाठी शेकडो अमरावतीकरांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी मंचावर माजी सरन्यायाधीश रमन्ना, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, नितीन सांबरे आणि प्रविण पाटील, अमरावतीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई, पत्नी डॉ. तेजस्वीनी गवई, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे पदाधिकारी अॅड. आशिष देशमुख, अॅड. पारिजात पांडे, अमरावती वकिल संघाचे अध्यक्ष सुनील देशमुख, उपाध्यक्ष अॅड. आशिष लांडे, सचिव अॅड. अमोल मुरळ, ग्रंथालय सचिव अॅड. विद्या मानके, कार्यकारिणी सदस्य अॅड. ऋषिकेश उपाध्ये, सुमित शर्मा, अक्षय बोले, नेतल मल्ला, आशिष सिंह परिहार, विशाखा तागडे, पूनम रिठे उपस्थित होते. यावेळी भूषण गवई यांना त्यांचे वडिल स्व. रा. सु. उपाख्य दादासाहेब गवई यांची प्रतिमा, चांदीचे मानपत्र, सोनेरी फे्रम, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.
आज सकाळी विमानतळावर उतरलो तेव्हापासून आपल्यावर अमरावतीकरांकडून प्रेमाचा प्रचंड वर्षाव सुरु आहे. आपल्या माणासांकडून मिळालेल्या या स्नेहामुळे आपण भारावून गेलो आहोत. शब्द सुचेनासे झाले आहेत. असे सांगून भूषण गवई यांनी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी-जीवनाचा अर्थ कळला’ या ओळी उच्चारल्या. अमरावतीकरांचे प्रेम आणि आशिर्वाद यामुळेच 40 वर्षात वकिलीत असो की उच्च आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, सरन्यायाधीश असो मी योग्य प्रकारे कार्य करु शकलो. 40 वर्षांचा जीवनपट यावेळी डोळयासमोर उभा राहतो आहे. आजही ते प्रेम कायम असल्याची ही पावती आहे. मी सदैव आपला ऋणी राहू इच्छितो, असे भूषण गवई म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन परिक्षित गणोरकर व शाहु चितळे यांनी तर आभार प्रदर्शन सचिव मुरळ यांनी केले
-दादासाहेबांमुळे सामाजिक जडणघडण
माझ्या जडणघडणीत आई कमलताई आणि वडिल दादासाहेब गवई यांचा वाटा मोठा आहे. आईने आमच्या शिक्षणासाठी कष्ट केले. माझ्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव दादासाहेबांचा राहीला. लहानपणापासून त्यांच्यासोबत समाजात वावरण्याची संधी मिळाली. समाजाचे प्रश्न कळले. त्यांच्या शिकवणीतूनच समाजाप्रती आपली भूमिका निश्चित करता आली. मी वकिल झालो, आज न्यायाधीश आहे, तो निर्णय वडिलांचाच होता. ‘वकिल झाला तर रग्गड पैसा कमावशील पण न्यायाधीश झाला तर बाबासाहेबांच्या सामाजिक समतेचं स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावू शकशील’, असे सांगून दादासाहेबांनी आपल्याला न्यायाधीश होण्यासाठी प्रेरित केल्याचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी सांगितले.
-न्यायदानाचे कार्य म्हणजे सतीचे वाण
न्यायदानाचे कार्य म्हणजे जॉब किंवा नोकरी नाही. ते सतीच वाण आहे. ती एक तारेवरची कसरत असते. न्यायाधीशाने आपल्या सदसदविवेकबुद्धीने निर्णय देणे अपेक्षित असते. लोक काय म्हणतील याचा विचार केला तर निवाडा होउ शकत नाही. घटनेतील तरतुदींना समोर ठेवूनच न्यायाधीशांनी निर्णय दिला पाहीजे, असे गवई म्हणाले. मला सरन्यायाधीश म्हणून लोकांच्या अपेक्षा वाढवायच्या नाहीत. यापूर्वी कालखंड संपताना लांबलचक आश्वासनं देणार्यांची उदाहरणं आपल्यासमोर आहेतच, असे सांगून गवई म्हणाले, मी एवढेच अभिवचन देतो की मी संविधानानुसार जी शपथ घेतली आहे, त्याला अनूसरुन योग्यतेनुसार आणि सदसदविवेक बूद्धीला मान्य होईल, असेच कार्य करण्याचा प्रयत्न करेल.
-संविधानच सुप्रिम
भारतात न्यायापालिका, कार्यपालिका आणि कायदेमंडळ यात श्रेष्ठ कोण असा प्रश्न नेहमीच उपस्थित होत असतो. घटनात्मक पदावरील व्यक्तींच्या यासंदर्भातील वक्तव्याने वादाचे प्रसंगही निर्माण झाले आहे. माझ्या मते आपल्या देशात केवळ संविधान सुप्रिम आहे, त्यानुसारच देशाचा कारभार योग्य प्रकारे चालू शकतो. असे गवई म्हणाले. सरकारच्या विरोधात निकाल दिला तर स्वतंत्र बाण्याचा न्यायाधीश समजला जातो. संविधानाने दिलेले अधिकार हे आपले कर्तव्य आहे. हे न्यायाधीशाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे, असे आपल्याला वाटत असल्याचे गवई म्हणाले.
-भाषणातून अनेकांचा केला नामोल्लेख
न्या. भूषण गवई यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणमहर्षी, पंजाबराव देशमुख तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, दादासाहेब गवई यांच्या स्मृतीला अभिवादन करुन आपल्या भाषणाला सुरुवात केली. सभागृहात शेकडो लोकांची उपस्थिती होती. त्यात भूषण गवई यांचे जूने सहकारी, मित्र, मार्गदर्शक, नातेवाईक, कौटुंबिक जिव्हाळ्याची मंडळी यांचाही समावेश होता. समोर बसलेल्यांपैकी अनेकांच्या नावांचा उल्लेख करुन न्या. गवई यांनी आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. भाषणाच्या शेवटी गवई म्हणाले की, आपण आपलेच याच मातीतले आहोत. अंबानगरीचे पुत्र आहोत. अमरातवीच्या नागरिकांनी प्रेमाचा वर्षाव केला, त्यात मी भिजून राहू इच्छितो. ‘आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला…राहू एकमेकांच्या मनात, या घरट्याला दार कशाला’, या अनामिक कवीच्या ओळी उच्चारुन त्यांनी भाषणाची सांगता केली.




