मेळघाटातील आमझरीचा ‘कॉफी मळा’ रोजगार फुलवणार
-5 हजार नव्या रोपांची लागवड

-चिखलदर्यात कॉफीच्या उत्पादनांना वाव
-आदिवासी शेतकर्यांचा कल वाढला
अमरावती / 27 जून : संपूर्ण महाराष्ट्रात कॉफीच्या उत्पादनाचं एकमेव केंद्र मेळघाटातील चिखलदरा इथं आहे. इथली ब्लॅक कॉफी पिण्यासाठी चवदार तर आहेच, शिवाय या कॉफीपासून बनवलेली सौंदर्य प्रसाधनंदेखील अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहेत. चिखलदरा आणि लगतच्या गावातील महिला बचत गटांना चांगला रोजगार मिळावा, या उद्देशानं महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्थेनं विशेष पुढाकार घेतला आहे. आमझरी इथं वन विभागाच्या वतीनं कॉफीची 5 हजार वृक्षांची बाग फुलवली जात आहे.
मधल्या काळात चिखलदर्याच्या कॉफीकडं दुर्लक्ष झालं आणि ही कॉफी काही ख्रिस्ती मिशनरीन पुरतीच मर्यादित झाली. मात्र, आता गत काही वर्षांत मारिपयमपूर, खटकाली आणि आमझरी परिसरात काही आदिवासी शेतकर्यांनी कॉफी उत्पादनावर भर दिलाय. कॉफीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊ शकते, असा नवा विचार महिला बचत गटांच्या माध्यमातून पुढे येत आहे. मेळघाटातील कॉफी वाढावी आणि या भागातील आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडून विचार केला जात आहे.
याच अनुषंगानं काही दिवसांपूर्वी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाशी संलग्नित असणार्या वर्धा इथल्या महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्थेच्यावतीनं वर्षभरापासून मेळघाटातील कॉफीवर विविध प्रयोग करण्यात आले आहेत. या संस्थेच्या प्रतिनिधी डॉ. शीतल शर्मा आणि शामली जमाणे यांनी नुकतीच चिखलदर्यातील कॉफीच्या बागांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी महिला बचत गटातील महिलांशी संवाद साधला. तसेच, कॉफीपासून तयार होणारं साबण, हॅन्डवॉश, फेस वॉश, लीपबाम, फेस पॅक, शॅम्पू, कंडिशनर, स्क्रबिंग मास्क अशा विविध 20 वास्तूंची माहितीही महिलांना दिली.
मेळघाटातील कॉफीचं वैशिष्ट्य आणि या कॉफीद्वारे आणखी नवीन कुठले प्रयोग करता येतील का? या उद्देशानं महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्थेच्या या महिला शास्त्रज्ञांनी मृयमपूर येथील फादर जेम्स, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल दईत, उपवनसंरक्षक यशवंत बहाळे, खटकली येथील कॉफी उत्पादक प्रकाश जांभेकर, गवताचे जाणकार असणारे सिपना महाविद्यालयातील प्रा. डॉ. गजानन मुरतकर, स्फूर्ती क्लस्टरचे संचालक सुनील भालेराव यांच्याशी देखील दीर्घ चर्चा करून कॉफीवर संशोधनासाठी माहिती संकलित केली. चिखलदरा वन विभागाच्या उद्यानात मोठ्या प्रमाणात कॉफीची झाडं आहेत. काही आदिवासी बांधव कॉफी उत्पादनाकडं वळले असतानाच, वन विभागानं देखील पुढाकार घेत आमझरीत एकूण 5 हजार कॉफीची झाडं लावली आहेत. आता वर्षभरात ही सर्व झाडं मोठी झाली की, आमझरी परिसरात मोठ्या प्रमाणात कॉफीचं उत्पादन वाढेल.
– चिखलदर्यात कॉफी आली कशी?
विदर्भातील थंड हवेचं ठिकाण अशी चिखलदराची ओळख. 1820 मध्ये इंग्रजांनी चिखलदर्यात कॉफी लागवडीचा पहिला प्रयोग झाला. तेव्हा मुल्हेरन कॉटेज या इंग्रज अधिकार्यानं केरळ मधून कॉफीची रोपं आणली आणि आपल्या निवासस्थानाच्या आवारात लावली. त्यानं वर्षभर कॉफीच्या झाडांची काळजी घेतली आणि इथल्या मातीत कॉफी रुजू शकते, हे सिद्ध केलं. चिखलदर्याची कॉफी इंग्रज शासन काळात तत्कालीन मद्रासच्या पोल्सन कंपनीकडं पाठवली जायची. देश स्वतंत्र झाल्यावर 1965 पर्यंत चिखलदर्याची कॉफी देशाच्या विविध भागात जायला लागली.




