एकनाथ शिंदेंचं आव्हान अजित पवारांनी स्वीकारलं

शिवसेनेचे मंत्री होणार अर्थ खात्याचे चौकीदार!

मुंबई / 26 जून: ज्यांना कोणाला अर्थ खात्यावर वॉच ठेवायचा आहे त्यांनी अवश्य ठेवावा. त्यांचे स्वागतच आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आव्हान स्वीकारत जणू प्रतिआव्हानच दिले आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्व मंत्री आता अर्थ खात्याचे चौकीदार होणार, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. मंगळवारी (24 जून) मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक झाली. त्यात सर्व मंत्र्यांनी अजितदादा निधी देत नाहीत, असे म्हणत तक्रारींचा पाढाच वाचला. त्यावेळी अर्थ खात्याकडून निधीचे वाटप कसे केले जाते, यावर लक्ष ठेवा, असे आदेश शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना दिले.
अर्थ खात्यात 14-14 हजार कोटींचे दोन निधी आहेत. त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. हा निधी कुठे वितरीत होत आहे यांची माहिती मिळाली पाहिजे, असे शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितले असल्याची माहिती आहे. मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करताच शिंदेंनी अजितदादांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, या बैठकीबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले, या बैठकीला कोणतेही वेगळे स्वरूप देऊ नका. ज्या दिवशी मंत्रिमंडळ बैठक असते त्यादिवशी प्रत्येक पक्ष प्री-कॅबिनेट घेतच असतो. महाविकास आघाडीमध्येही सर्वच पक्ष अशी बैठक घेत होते. त्यामुळे अशी बैठक घेतली तर बिघडले काय? असा सवालही त्यांनी केला.
तसेच तुमच्या अर्थ खात्यावर वॉच ठेवायला सांगितले जात आहे, अशी चर्चा आहे, असे विचारताच पवार अगदी हसत हसत म्हणाले, ज्यांना कोणाला अर्थ खात्यावर वॉच ठेवायचा आहे त्यांनी तो अवश्य ठेवावा, प्रत्येकाला वॉच ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्यांचे स्वागतही आहे. याहून जास्त मी सांगू शकत नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच अजितदादांनी शिंदेंच्या मंत्र्यांना फटकारले होते. निधी वाटपाची एक पद्धत, प्रक्रिया आहे. त्यानुसार निर्णय होत असतात. मी काही निधी खिशात घेऊन फिरत नाही, असे अजितदादा म्हणाले होते. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या

Back to top button