मराठीवरून महाविकास आघाडीत फूट?
ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत

* काँग्रेसला बोलावले नाही
मुंबई/3 जुलै– हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. पहिली पासून हिंदीची सक्ती नको, अशी भूमिका राज्यातील अनेक संघटना आणि विरोधी पक्षांची होती. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्रित येऊन मोर्चा काढणार होते. परंतु, त्यापूर्वीच सरकारकडून त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द करण्यात आले. मात्र आता त्याच दिवशी ठाकरे बंधू एकत्र येऊन विजयी मेळावा साजरा करणार आहेत. यावरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मेळाव्याचे निमंत्रण काँग्रेसला देण्यात आलेले नसून, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला आता शरद पवारही जाणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. 5 जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचे निमंत्रण काँग्रेसला मिळाले नसल्याचे म्हटले जात आहे. आम्हाला अजून तसे काही निमंत्रण मिळालेले नाही किंवा सांगण्यात आलेले नाही. कदाचित हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा इव्हेंट असू शकतो. 5 जुलै हा मोर्चा काढण्यासाठी दिवस ठरला होता. पण हा जीआर रद्द झाला आहे असे मला अजूनही वाटत नाही. कारण नरेंद्र जाधव समिती नेमली आहे. त्यामुळे ‘मुंह में राम, बगल में नथुराम’ या भाजपाच्या नितीपासून जपून राहणे आवश्यक आहे. 5 जुलैचा दिवस मराठी लोक साजरा करतील, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी दिली होती. यानंतर आता शरद पवार हेही ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत.




