आ. संजय गायकवाडांची कँटिन कर्मचार्‍याला मारहाण

विरोधकांसह स्वपक्षीयांकडूनही जोरदार टीका

-कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांची सभापतींकडे शिफारस
मुंबई / 9 जुलै: निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याचा आरोप करत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मंगळवारी रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचार्‍याला मारहाण केली. या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी विधान परिषदेत उमटले. दरम्यान, हा मुद्दा अध्यक्ष व सभापतींच्या अख्यारित येत असल्यानं कारवाई करावी, अशी शिफारस याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती राम शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळं आमदार संजय गायकवाड अडचणीत येण्याची शक्यता आहे. संजय गायकवाड यांच्यावर या अशोभनिय कृतीवरुन विरोधकांसह स्वपक्षातील काही आमदार व नेत्यांनीही टिकेची झोड उठविली आहे.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मंगळवारी रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधून डाळ व भात खराब दिल्याचा आरोप केला. तसंच संजय गायकवाड यांनी संतापाच्या भरात कॅन्टीनमधील कर्मचार्‍याला मारहाण केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले. त्यानंतर आज शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. सरकारमधील आमदार बनियान टॉवेलवर येऊन एका गरीब कर्मचार्‍यांना मारहाण करतो. आमदारांनी कसं राहावं, याचे काही संकेत आहेत की नाहीत. हे गल्लीतील लोक आहेत का? सरकारच्या प्रतिमेला यामुळं बट्टा लागतो आहे. त्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी अनिल परब यांनी केली.
याचबरोबर, अशा लोकांचा तुम्ही पाठिंबा घेणार का? अशा लोकांच्या पाठिंब्यावर सरकार चालवणार का?, अशा प्रश्नांची सरबत्ती अनिल परब यांनी केली. पुढं ते म्हणाले की, आमदार निवास विधिमंडळाच्या कार्यकक्षेत येते. विधिमंडळात मी कुणाला मारहाण केली तर तुम्ही निलंबित कराल. त्यामुळं या आमदाराचं निलंबन करून असे प्रकार खपवून घेणार नाही, असा संदेश जनतेला द्या… अशी मागणी अनिल परब यांनी केली.
दरम्यान, निकृष्ट दर्जाचं जेवण मिळालं तर तक्रार करता येते. परंतु, अशी मारहाण योग्य नाही. आमदाराच्या अशा वर्तनामुळं लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होतो. लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. आमदारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. सभापती व विधानसभा अध्यक्षांनी याची दखल घेऊन योग्य कारवाई करावी, अशी शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती राम शिंदे यांच्याकडे केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button