अमरावती एसआरपीएफ कार्यालयात चक्क बिबट्याचा फेरफटका

परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड दहशत

-समाज माध्यमांवर फिरतोय व्हिडिओ
-शहरात बिबट्यांचा वावर वाढला
अमरावती / 22 जून : शहरातील राज्य राखीव पोलीस दल क्रमांक 9 येथील दोन मजली इमारत असणार्‍या कंपनी कार्यालयात चक्क एक बिबट शनिवारी रात्री फेरफटका मारुन गेला. जिन्यावरून पायर्‍या चढत मोठ्या ऐटीत इमारतीत फिरणारा हा बिबट सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
एसआरपी कॅम्प परिसरातील कार्यालयीन इमारतीत बिबट शिरल्याची माहिती मिळाल्यावर, शनिवारी मध्यरात्री वन विभागाचे बचाव पथक बिबट फिरत असलेल्या इमारतीच्या परिसरात दाखल झाले. तेव्हा या इमारतीत फेरफटका मारून बिबट पुन्हा पायर्‍यांवरून उतरून इमारती बाहेर पडला. तो लगतच असणार्‍या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भिंतीवरून विद्यापीठ परिसरातील झुडपामध्ये पळाला अशी माहिती, वन विभागाच्या बचाव पथकाचे प्रमुख अमोल गावनेर यांनी दिली.
राज्य राखीव पोलीस दल वसाहत परिसरात गत काही वर्षांपासून अनेकदा बिबट येतो आहे. लगतच असणार्‍या वडाळी, पोहरा जंगल परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जंगल परिसराला लागून असणार्‍या काही निवासस्थानाजवळ सायंकाळी 7 वाजता देखील बिबट दिसतो. झुडपात, एखाद्या खड्ड्यात बिबट दडून बसतो. राज्य राखीव पोलीस दल वसाहतीमधले अनेक कुत्र्याची शिकार बिबट्यांनी केली आहे. परिसरात फिरणारा बिबट आता कार्यालयाच्या इमारतीत शिरला. यावेळी येथे ड्युटीवर असणारे कर्मचारी सुदैवानं त्याच्या समोर आले नाहीत म्हणून मोठा अनर्थ टाकला. कर्मचारी वसाहत परिसरात महिला, लहान मुलांमध्ये बिबटची दहशत आहे.
-तपोवन परिसरात कुत्र्याची शिकार
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला लागून असणार्‍या तपोवन परिसरात डॉक्टर कॉलनी येथे 15 जूनला बिबटने चक्क एका घराच्या गेटवरून घराच्या आवारात उडी घेतली. यावेळी घरच्या आवारात असणार्‍या कुत्र्याची शिकार बिबटनं केली होती. हा व्हिडिओ देखील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. तपोवन, विद्यापीठ, राज्य राखीव पोलीस दल आणि महादेवखोरी या भागात बिबट्यांचं प्रमाण फार वाढलं आहे.

संबंधित बातम्या

Back to top button