भाजपमध्ये फडणवीसांविरोधात मोठा गट सक्रिय

नाना पटोलेंकडून भविष्यात राजकीय स्फोटाचा दावा

मुंबई /5 जानेवारी : सध्या राज्यभर महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक जोरदार प्रचार करत असून एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मात्र एकीकडे प्रचार सुरू असतानाच दुसरीकडे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने पक्षातंर्गत वाद होताना दिसत आहे. अशातच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपमधील अंतर्गत वादावर मोठा गौप्यस्फोट केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी दावा केला की, सुधीर मुनगंटीवार यांचे जे काही चालले ते देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र यांना पदावरून हटवण्यासाठी भाजपचा एक मोठा गट सक्रिय झाला आहे. परंतु त्या सक्रिय गटात काय-काय चाललंय हे देवेंद्र फडणवीस यंना यांना माहित आहे. असे असले तरी या सत्य संघर्षाचा स्फोट पुढच्या काळात पाहायला मिळेल. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक मोहीम दिल्लीतही सुरू आहे. मुनगंटीवार यांना मंत्री केलं नसल्यामुळे त्यांनी जाहीरपणे भूमिका नगरपालिका परिषद निवडणुकीत मांडली आहे. मला ताकद दिली जात नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या (सुधीर मुनगंटीवार) मनात काय चालू आहे, ते आपल्याला पाहायला मिळत आहे. या सगळ्या संघर्षचा परिणाम जनतेला शेतकरी जनतेला भोगावे लागत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात भाजपाविरोधात मोठा उद्रेक आहे. तसेच महायुती सरकारच्या विरोधात रोष आहे, त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो, असा दावा पटोले यांनी केला.

भाजपने विधानसभा अध्यक्षांना बदलावे

बिनविरोध निवडीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, सुरुवातीला बिनविरोध निवडींची चौकशी करण्याचे आश्वासन निवडणूक आयोगाने दिले होते, मात्र आता आयोगाने चौकशी करण्याच्या आश्वासनावरून ‘यू-टर्न’ घेतला आहे. परंतु 68 ते 70 जागांवर ज्या पद्धतीने बिनविरोध निवडणुका झाल्या, त्यामागे सत्ताधार्‍यांचा दबाव आहे. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी दबाव आणल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे आता विधीमंडळाची परंपरा जपण्यासाठी भाजपने तातडीने विधानसभा अध्यक्षांना बदलावे.

संबंधित बातम्या

Back to top button