विकास आणि सामाजिक समरसतेचा समतोल साधणारा अर्थसंकल्प
आ. संजय खोडके यांचे सभागृहात जोरदार समर्थन

* विकसित महाराष्ट्र 2047 च्या संकल्पनेवर सरकारचा भर
मुंबई/ 11 मार्च – राज्य विधानसभेच्या 2026-27 या वर्षाच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना आमदार संजय खोडके यांनी या अर्थसंकल्पाचे जोरदार समर्थन केले. हा अर्थसंकल्प केवळ आर्थिक तरतूद नसून राज्याच्या विकासाचा समतोल राखणारा आणि सामाजिक समरसता प्रस्थापित करणारा दस्तऐवज असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळून नवीन औद्योगिक क्रांतीला दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ’विकसित महाराष्ट्र 2047’ हे ध्येय समोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अंतर्गत 2047 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार मुख्य स्तंभांवर आधारित नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कृषी, ग्रामीण विकास, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, समाजकल्याण, जलव्यवस्थापन, ऊर्जा, परिवहन, पर्यटन, नगरविकास आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात आधुनिकते सोबतच अध्यात्माचाही संगम पाहायला मिळतो, असे खोडके यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त तेथे पायाभूत सुविधांच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच महात्मा जोतिराव फुले यांच्या सातारा जिल्ह्यातील कटगुण या जन्मस्थानी भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्तावही स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले. संत गाडगे बाबा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करणे आणि 75 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ’पायलट प्रोजेक्ट’ सुरू करण्याची योजना महत्त्वपूर्ण ठरेल. याशिवाय, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने ’गतिमान नागरिक सन्मान पुरस्कार’ सुरू करण्याच्या घोषणेचेही खोडके यांनी स्वागत केले.




