जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 7 हजार 695 अर्ज

पंचायत समितीच्या 1 हजार 462 जागांसाठी 13 हजार उमेदवार रिंगणात

मुंबई/22 जानेवारी – महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, मर्यादित जागांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या मोठी असल्याने या निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरणार आहेत. जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी तब्बल 7 हजार 695 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, पंचायत समितीच्या 1 हजार 462 जागांसाठी सुमारे 13 हजार उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. अनेक ठिकाणी एका जागेसाठी दहा ते पंधरा उमेदवार रिंगणात असल्याने बहुकोनी लढती होण्याची शक्यता आहे. कोकण विभागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 50 जागांसाठी 272 अर्ज दाखल झाले असून, पंचायत समितीच्या 100 जागांसाठी तब्बल 441 उमेदवार मैदानात उतरले आहेत. लोकसंख्या तुलनेने कमी आणि राजकीय क्षेत्र मर्यादित असतानाही अर्जांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि ग्रामपातळी वरील राजकारणामुळे येथे अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते.
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 56 जागांसाठी 226 अर्ज तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी 444 अर्ज दाखल झाले आहेत. काही तालुक्यांमध्ये एका जागेसाठी सहा ते आठ उमेदवार रिंगणात असून, पारंपरिक राजकीय पक्षांसह नव्या चेहर्‍यांनीही मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज भरले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातही चित्र वेगळे नाही. पुण्यात जिल्हा परिषदेच्या 73 जागांसाठी 853 अर्ज तर पंचायत समितीच्या 146 जागांसाठी 1 हजार 482 अर्ज दाखल झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी सर्वाधिक 907 अर्ज आले असून, पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 1 हजार 529 उमेदवार रिंगणात आहेत. धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 55 जागांसाठी 967 अर्ज आणि पंचायत समितीच्या 110 जागांसाठी 1 हजार 360 अर्ज दाखल झाल्याने तेथेही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. सातारा, सांगली, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही अर्जांची संख्या मोठी असून, अनेक ठिकाणी थेट लढतीऐवजी बहुकोनी संघर्ष पाहायला मिळणार आहे .

संबंधित बातम्या

Back to top button