29 मनपा आयुक्तांची बोलावली तातडीची बैठक
निवडणूक आयोगाकडून झेडपीच्या पूर्वी निवडणुकांची तयारी

* जि.प.च्या निवडणुकाही दोन टप्प्यात होण्याची शक्यता
मुंबई /3 डिसेंबर – राज्यातील 54 नगरपरिषदा आणि पंचायतींच्या निवडणुका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यानंतर आणि मंगळवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या दरम्यान राज्य निवडणुक आयोगाने जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुका घेण्यावर सक्रीय झाले आहे.
या पार्श्वभुमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात होऊ शकतात असे संकेत मिळत आहेत. राज्यातील 15 जिल्हा परिषद व 29 महानगरपालिकाच्या निवडणुका खोळंबलेल्या आहेत. तर दुसरीकडे 29 महापालिका आयुक्तांची बैठक राज्य निवडणुक आयोगाकडून तातडीने बोलावण्यात आली आहे. त्यामुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे. नुकताच स्वराज्य संस्थांच्या काही निवडणूका अचानक आयोगाने लांबणीवर टाकल्यामुळे नेत्यांकडून टिका होत आहे. न्यायालयाच्या आदेशावरून आरक्षित जागांवरुन निवडणुक आयोगाची धांदल उडाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणुक दोन टप्प्यात होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 17 जि.प. मध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरीत 15 जि.प. ची निवडणुक पहिल्या टप्प्यात करण्याची तयारी आयोगाकडून करण्यात येत आहे, अशी सुत्राकडून माहिती मिळाली आहे. आरक्षणाच्या मुद्यावर पुढील सुनावणी 21 जानेवारीला होत आहे. ज्या ठिकाणी आरक्षणाची समस्या नाही तेथे निवडणुका घेण्यास कुठलीही अडचण नाही. तर दुसरीकडे गुरुवार 4 डिसेंबर रोजी आयोगाकडून राज्यातील महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या दरम्यान मतदार यादी सह निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेण्यात येईल. विदर्भातील फक्त चंद्रपुर आणि नागपुर महापालिकेने आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे.
अकोला, अमरावतीचा मार्ग सुकर -महापालिका निवडणुकीची चर्चा करावयाची झाल्यास अमरावती व अकोला दोन्ही ठिकाणी आरक्षणाच्या मर्यादेचे तंतोतंत पालन करण्यात आले आहे त्यामुळे दोन्ही महापालिकेची निवडणुक लवकरच होण्याची शक्यता आहे. याच मुद्यावर निवडणुक आयोगाकडून गुरुवार 4 डिसेंबर रोजी तातडीची बैठक बोलाविली असल्याचे संकेत मिळाले आहे. त्यामुळे जि.प.च्या निवडणुकी पूर्वी महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.




