28 तृतीयपंथीयांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

इंदुरधील धक्कादायक घटना

मुंबई/16 ऑक्टोबर – मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे तब्बल 28 तृतीयपंथीयांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सर्वांनी फिनाइल प्राशन केल्याने त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांना तातडीने उपचारासाठी एमवाय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. फिनाइल पितानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इंदूरच्या पंधरीनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदलालपुरा भागात घडली. येथे राहणाऱ्या 28 तृतीयपंथीयांनी एका खोलीत दरवाजा बंद करून फिनाइल प्यायले आणि त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

घटनेच्या पार्श्वभूमीवर समजते की तृतीयपंथीयांच्या दोन गटांमध्ये बराच काळ वाद सुरू होता. नंदलालपुरा येथे एक गट सपना गुरुंचा असून दुसरा गट सीमा आणि पायल गुरुंचा आहे. या दोन्ही गटांमध्ये अनेक वेळा वाद झाले आहेत. याच वादातून अखेर मंगळवारी या 28 तृतीयपंथीयांनी एकत्रितपणे फिनाइल प्यायल्याचे समजते.

दरम्यान, किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठी देखील या वादानंतर इंदूरला पोहोचल्या आणि त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. या वादाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली असली तरी तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. या घटनेमुळे तृतीयपंथीय समाजात आणि स्थानिक प्रशासनातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button