25 लाख शेतकर्‍यांना होणार फायदा

यापुढे कर्जमाफीत रकमेची मर्यादा नाही

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

मुंबई/5 डिसेंबर राज्यातील शेतकर्‍यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदाच्या कर्जमाफी योजनेत रकमेवर कोणतीही मर्यादा ठेवली जाणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. पूर्वीच्या योजनांमध्ये दीड ते दोन लाखांपर्यंतची मर्यादा असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते, पण आता नवीन निर्णयामुळे थकबाकीदार शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, राज्यातील शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळ णार आहे. सहकार खात्या मार्फत जिल्हा निहाय माहिती माग वण्यात आली आहे. प्रविणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली आहे. ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सरकारला सादर करेल. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकार 30 जूनपूर्वी शेतकर्‍यांना कर्जमाफी देणार आहे. राज्यातील सुमारे 24 लाख 73 हजार शेतकरी थकबाकीत आहेत. त्यांच्या बँकांवरील थकबाकीची रक्कम जवळपास 35,477 कोटी आहे. यापूर्वी 2017 मध्ये राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी दीड लाखांची कर्जमाफी जाहीर केली होती, तर 2019 मध्ये ही मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढवण्यात आली होती. या मर्यादेमुळे अनेक शेतकरी त्या योजनांचा लाभ घेऊ शकले नाहीत. पण सध्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर थकबाकीदार शेतकर्‍यांचा सातबारा उतार कोरा केला जाणार आहे, ज्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.या योजनेत सुमारे 25 लाख शेतकर्‍यांना थेट फायदा होईल, आणि त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. कृषीमंत्र्यांच्या मते, नवीन योजना पारदर्शक आणि सर्वसमावेशक असून शेतकर्‍यांच्या आर्थिक भारावर लक्ष देणारी आहे.

संबंधित बातम्या

Back to top button