ईडी, सीबीआयचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात
राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली/12 ऑक्टोबर : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आज सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला जाणार असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. या मोर्चापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी खळबळजनक दावा केला आहे. नरेंद्र मोदी, तुम्ही हैराण व्हाल. पण तुमच्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात आहेत. आम्हाला माहिती देत आहेत. ईडी, सीबीआय, परराष्ट्र मंत्रालय अशा विविध ठिकाणचे अधिकारी आम्हाला माहिती पुरवत आहेत. तुम्हाला आता जे करायचंय ते करा, पण सत्य आमच्यासोबत आहे, असं ते म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या कारभारावर हल्लाबोल करताना राहुल गांधी यांनी म्हटलं की, भाजप-आरएसएसचे गुंड महिलांना मारहाण करत आहेत. आंदोलकांना मारहाण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना मोकळीक का दिली जात आहे? भारतातील लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील निष्पक्षतेच्या हत्येप्रकरणी आम्ही सरन्यायाधीशांना पत्र लिहिलं होतं. त्यांनी आम्हाला कोर्टात याचिका दाखल करण्यास सांगितलं आहे. पोलीस पण थकत आहेत की आणि विचार करतायत की आपण ज्ञानेश कुमार यांच्यासारख्या चोराला का वाचवत आहोत? पण आम्ही थकणार नाही. इंडिया आघाडी मतचोरीच्या मुद्द्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली.





