पाणी काढताना विहिरीत पडली 13 वर्षीय चिमुकली

मेळघाटातील पाणी समस्येचे भीषण वास्तव समोर

-साहसी झेंडूने हिंमतीने वाचविले स्वत:चे प्राण
धारणी/ 22 जून : पावसाळा सुरु झाला असला तरी मेळघाटातील पाण्याची समस्या अद्यापही भीषण स्वरुपात आहे. याची प्रचिती धारणी तालुक्यातील नंदगाव येथे घडलेल्या एका खळबळजनक घटनेतून आली आहे. तळाशी गेलेल्या विहीरीतून जीव धोक्यात घालत पाणी काढण्याच्या प्रयत्नात तोल जावून 13 वर्षीय चिमुकली विहिरीत पडली. सुदैवाने या साहसी मुलीने स्वत:च हिंमत दाखवून विहीरीबाहेर येत आपले प्राण वाचविले. झेंडू भिलावेकर असे या मुलीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, धारणी तालुक्यातील नंदगाव येथील रहिवासी असलेली झेंडू भिलावेकर ही आपल्या दोन मैत्रिणींसह गावातील पाणी पूरवठ्याच्या विहीरीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. विहिरीतून पाणी काढत असताना झेंडूचे संतुलन बिघडले आणि तोल जावून ती खोल विहिरीत पडली. रात्री ही घटना घडली. विहीरीत पूर्णत: अंधार असतानाही घटनेनंतर झेंडू घाबरली नाही. तिने हिंमत व समयसुचकता दाखवून विहीरीतील मोटरपंपचा वायर हातात पकडला आणि त्याच्या सहाय्याने तग धरुन राहीली.
वर झेंडूच्या मैत्रिणी या घटनेमुळे घाबरुन गेल्या होत्या. त्यांनी मोठ्याने आरडाओरड सुरु केली. काही वेळात गावातील लोक विहीरीजवळ गोळा झाले. काही लोकांनी विहीरीत उतरुन झेंडूला दोराच्या सहाय्याने वर काढले आणि तिचे प्राण वाचले. या घटनेमुळे नंदगावसह मेळघाटात खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button