13 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या

जळगावातील घटना, नरबळीचा संशय

जळगाव / 17 जून: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खर्ची गावात एका 13 वर्षीय मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत मुलाचा मृतदेह शेजारील गावच्या शेतात फेकून देण्यात आला होता, ही घटना नरबळीसाठी तर घडवून आणली गेली नाही ना, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. तसेच या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अखंड जळगाव यामुळे हादरलं आहे. पोलिसांनी सदर घटनेची तात्काळ नोंद करून पुढील तपासणीला सुरूवात केली आहे.
तेजस महाजन (वय 13) असं मृत मुलाचं नाव असून तो रिंगणगाव येथे राहणारा, तो काल म्हणजेच 16 जूनपासून बेपत्ता झाला होता. तेजस अचानक दिसेनासा झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी गावात व परिसरात शोधाशोध सुरू केली होती, मात्र कुठेच त्याचा पत्ता लागला नाही. रात्री उशिरापर्यंत गावकर्‍यांनी शोध घेतला, मात्र त्याचा काहीही मागमूस लागला नाही. अखेर 17 जून रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ताबाबतची तक्रार दाखल करण्यात आली. खर्ची गावाजवळील एका शेतात तेजसचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात तेजसच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले. सदर घटनेचा पोलीस विविध अंगाने तपास करत असून अद्याप हत्येमागील नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.

 

 

 

 

संबंधित बातम्या

Back to top button