आ. संतोष बांगर यांच्या घरी 100 पोलिसांची धाड

भाजपा आमदाराच्या दबावाखाली कारवाई

* शिवसेना नेते हेमंत पाटील यांचा गंभीर आरोप

हिंगोली /27 नोव्हेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका होणार आहेत. मात्र त्याआधीच महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात पक्षांत्तरावरून वाद होताना दिसत आहेत. अगदी खासदार, आमदारांपासून ते नगरसेवक आणि माजी नगरसेवकांपर्यंत हा वाद सुरू असल्याचे दिसते. अशातच हिंगोली जिल्ह्यातील कळम नुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांच्या निवासस्थानी पोलिसांनी धाड टाकल्याचा दावा शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. संतोष बांगर यांच्या निवासस्थानी धाड टाकल्याची बातमी अद्याप समोर आली नसली तरी हेमंत पाटील यांनी भाजपा आमदारावर आरोप केले आहे.एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना हेमंत पाटील म्हणाले की, हिंगोली आणि कळमनुरी या दोन्ही शहरांमध्ये शिवसेनेची ताकद आहे. दोन्ही शहरांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष होणार आहेत. तसेच कार्यकर्ते अत्यंत उत्तम पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकारला लागली आहे, हे या निवडणुकीच्या निमित्ताने लक्षात आलं आहे. त्यामुळेच आमदार संतोष बांगर यांच्या घरावरती सकाळी पाच ते साडे पाच वाजता 100 पोलिसांनी जावून झाडाझडती घेतली. परंतु संतोष बांगर यांची 75 ते 80 वर्षांची आई आजारी असते. ती घरात असताना, तसेच त्यांची पत्नी आणि लहान मुलं घरात असताना अशा पद्धतीने घरातील सामान काढून बघणं, कपाटातील सामान काढून बघणं, ही अतिशय वाईट गोष्ट आहे.
संतोष बांगर यांच्या घरीवरील कारवाईवर बोलताना हेमंत पाटील म्हणाले की, आमदार पद हे संविधानिक पद आहे आणि त्याला संविधानिक दर्जा आहे. अशा संविधानिक पदावर कार्यकर्ता असलेल्या आमदारावर धाड टाकायची असेल तर विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. परंतु त्या पद्धतीची कोणतीही परवानगी पोलीस अधिकार्‍यांनी घेतलेली नाही. मी स्वत: विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की, कुठल्याही प्रकारचा मेल आलेला नाही. कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. मग परवानगी न घेता पोलिसांनी अशाप्रकारची धाड कुणाच्या सांगण्यावर टाकली? असा सवाल करत हेमंत पाटील म्हणाले की, इथल्या स्थानिक आमदाराच्या (तानाजी मुटकुळे) दबावाखाली येऊन पोलिसांनी जी कारवाई केली आहे, त्याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button