महिला खासदाराची सोनसाखळी चोरट्याने उडवली
काँग्रेस खा.आर.सुधा यांनी अमित शहांना पत्र लिहून सांगितली आपबीती

नवी दिल्ली/4 ऑगस्ट – दिल्लीतील चाणक्यपुरी हा व्हीव्हीआयपी परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात तामिळनाडूच्या महिला खासदारासोबत चैनस्नॅचिंगची घटना घडली आहे. महिला खासदार सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्या गळ्यातील सोनसाखळीवर चोरट्यांनी हात साफ केला. स्कुटीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरली. या प्रकरणाची माहिती त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना दिली आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांचे दहा पथक चोरांचा शोध घेत आहेत. तामिळनाडू येथील मयिलादुथुराई मतदारसंघातील लोकसभा खासदार आर. सुधा सोमवारी सकाळी तामिळनाडू हाऊस येथून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या. पोलंड दुतावासासमोर विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकी चालकाने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. यामध्ये त्यांना दुखापत देखील झाली असल्याचे खासदार आर. सुधा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. काँग्रेस खासदार आर. सुधा यांनी सोनसाखळी चोरीसंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. त्यांनी म्हटले की, मी तामिळनाडूमधून खासदार आहे. नियमितपणे संसदेच्या कामात सहभागी होते. मात्र मला इतर खासदारांप्रमाणे खासदारांसाठीचे अधिकृत निवासस्थान मिळालेले नाही. यामुळे मला गेल्या एक वर्षापासून तामिळनाडू हाऊस येथे राहावे लागत आहे. सोनसाखळी चोरीबद्दल काँग्रेस खासदार आर सुधा यांनी पत्रात लिहिले की, मी रोज सकाळी फिरायला जाण्याची माझी सवय आहे. आज (सोमवार सकाळी 6.15 ते 6.20 दरम्यान मी राज्यसभेतील महिला खासदारांसोबत तामिळनाडू हाऊसमधून बाहेर पडले. सकाळी फिरत फिरत पोलंड दुतावासाच्या गेट क्रमांक 2 – 3 येथे पोहोचले. याठिकाणी उलट दिशेने एक स्कुटीचालक माझ्या दिशेने आला. त्याने हेल्मेट घातलेले होते. माझ्याजवळ आल्यानंतर त्याने माझ्या गळ्यातील सोनसाखळी ओढून नेली. खासदार आर. सुधा यांनी सांगितले की, स्कुटी चालक अतिशय हळुवार आमच्या दिशेने आला त्यामुळे त्याच्याबद्दल शंका आली नाही आणि त्याने माझ्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचली. यामुळेमाझ्या गळ्याला दुखापत झाली आहे. काही वेळाने आम्हाला या भागात दिल्ली पोलिसांची मोबाईल पेट्रोलिंग वाहन दिसले. त्यांच्याकडे आम्ही तक्रार केली. तेव्हा त्यांनी लिखित तक्रार करण्यास सांगितले.




