वैष्णो देवी यात्रेत कहर : दरड कोसळून 36 मृत, 23 जखमी
रेल्वे व रस्ते वाहतूक ठप्प, यात्रा स्थगित

-जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे हाहाकार
कटरा / 27 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरमधील कटरा येथील वैष्णो देवी यात्रेच्या मार्गावर बुधवारी (27 ऑगस्ट) सकाळी भीषण दरड कोसळल्याने प्रचंड जीवितहानी झाली. घटनेत 36 भाविकांचा मृत्यू झाला असून 23 जखमी आहेत. त्रिकूट पर्वतरांगांवरील कटरा-भवन मार्गावर माती, दगड व झाडांचे ढिगारे कोसळल्याने अनेक भाविक ढिगार्याखाली अडकले आहेत. स्थानिक प्रशासनाने बचावकार्य सुरु केले असून अद्याप काही अडकलेल्यांचा शोध सुरु आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक नदी-ओढ्यांना पूर आला असून, रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. जम्मूमधील एका नदीवरील पूल पाण्याच्या प्रचंड लोटात वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी वीज खंडित झाली आहे, तर शॉर्ट सर्किट आणि विद्युत खांब कोसळल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये वीज नाही. मंगळवारी फक्त सहा तासांत 22 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली होती. मुसळधार पावसामुळे रेल्वे व्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे. नॉर्दन रेल्वेने 22 गाड्या रद्द केल्या, तर 27 गाड्या अर्ध्यात थांबवल्या आहेत. यात वैष्णो देवी बेसकॅम्पकडे जाणार्या नऊ गाड्यांचा समावेश आहे. कटरा-भवन महामार्ग तसेच अनेक लहान रस्ते माती व दगडांनी बंद झाले आहेत. प्रवासी अडकले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
जम्मू-कश्मीर प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथके, पोलीस व अर्धसैनिक दल घटनास्थळी दाखल केले आहेत. ढिगार्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरु असून, बचावकार्य सतर्कतेने चालू आहे. प्रशासनाने भाविकांना प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुसळधार पावसामुळे आणखी दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याचे सांगितले आहे. स्थानिकांनी सांगितले की, अनेक गावांमध्ये रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. तसेच विजेचे खांब कोसळल्याने घरांमध्ये अंधार पसरला आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने पाणी निघण्याचे उपाय राबवले आहेत, पण परिस्थिती अद्याप नियंत्रणात नाही.




