भ्रष्टांना खुर्ची नाही, तुरुंगातच कारकीर्द संपणार

बिहारमध्ये पीएम नरेंद्र मोदींचा इशारा

-13 हजार कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ
-दोन नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा
पटणा / 22 ऑगस्ट : बिहारमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल तेरा हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे उद्घाटन केले आणि दोन नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी जनसभेला संबोधित करताना त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात ठाम भूमिका घेतली आणि नवीन घटनादुरुस्तीबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नुकतेच गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकसभेत मांडण्यात आलेल्या 130 व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार, जर एखादा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री गुन्ह्यात अटक होऊन तीस दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिला, तर एकतीसाव्या दिवशी त्याला पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. यावर भाष्य करताना मोदी म्हणाले की, पंतप्रधान असो वा मुख्यमंत्री, जो तुरुंगात गेला त्याची खुर्ची टिकणार नाही, तुरुंगातून कोणीही सरकार चालवू शकणार नाही, भ्रष्ट नेत्याला खुर्ची गमवावीच लागेल, असे त्यांनी ठणकावले.
आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्रीय जनता दलावरही जोरदार हल्ला चढवला. लालटेन राजवटीच्या काळात बिहारला दहशतीनं घेरलं होतं, अशी टीका करत त्यांनी सांगितले की जनता आता विकासाचा प्रकाश पाहत आहे. दरम्यान, पंतप्रधान आवास योजनेबाबत बोलताना मोदींनी आपला संकल्प पुन्हा दृढ केला. मला जनतेचा सेवक बनून काम करण्यात सर्वात आनंद मिळतो, असे सांगून त्यांनी आजवर देशातील चार कोटींहून अधिक कुटुंबांना पक्की घरे दिल्याची आठवण करून दिली. एकट्या बिहारमध्ये आठतीस लाख घरे उभारली असून फक्त गयातीलच दोन लाख लोकांना घरे मिळाली आहेत. मोदी म्हणाले, आम्ही फक्त चार भिंती दिल्या नाहीत, तर गरिबांच्या डोक्यावर छप्परासोबत त्यांचा स्वाभिमान परत केला आहे. जोपर्यंत प्रत्येक गरीब कुटुंबाला आपले हक्काचे घर मिळत नाही, तोपर्यंत ही योजना सुरू राहणार, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
बिहारमध्ये आगामी दिवाळी आणि छठपूजा या वर्षी अधिक रोषणाईत साजर्‍या होतील, कारण विकासाची गंगा आता अधिक वेगाने प्रत्येक कोपर्‍यात पोहोचत आहे, अशी खात्री त्यांनी जनतेला दिली. याच कार्यक्रमात त्यांनी सुरक्षेविषयी वक्तव्य करत दहशतवाद्यांना स्पष्ट इशाराही दिला. त्यांनी सांगितले की, भारतात कोणी दहशतवादी हल्ला केला तर तो जिवंत सुटणार नाही. अगदी पाताळात लपले तरी भारताची क्षेपणास्त्रे त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाहीत. बिहारच्या मोठ्या जनसमुदायासमोर केलेल्या या भाषणात पंतप्रधान मोदींनी विकास, पारदर्शकता, भ्रष्टाचाराविरोधी लढा आणि गरीबकल्याण या चार गोष्टी बिहारच्या लोकांपर्यंत पोहोचवल्या. तेरा हजार कोटींची विकासकामे, दोन नव्या रेल्वेमार्गांची भेट, भ्रष्टांना खुर्चीवरून दूर करणारा नवीन कायदा आणि प्रत्येक गरीबाला घर मिळेपर्यंतची हमी या घोषणांनी बिहारच्या भूमीत मोठा उत्साह पसरवला.

संबंधित बातम्या

Back to top button