पंचाहत्तरीचे विधान चुकीच्या अर्थाने जोडले गेले

सरसंघचालकांनी दिले स्पष्टीकरण

-भाजपा-संघ संबंधावरही खुलासा
-राष्ट्रहितासाठी ‘हम दो हमारे तीन’चा नारा
नवी दिल्ली/ 28 ऑगस्ट  : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना शताब्दी निमित्त आयोजित संघाच्या प्रवासाची 100 वर्षे – न्यू होरायझन्स व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध विषयांवर स्पष्ट मत मांडले. विशेषतः 75 व्या वर्षी निवृत्ती घ्यावी, असा वाद निर्माण करणारे विधानाबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले. भागवत म्हणाले, मी कधीच असे म्हणाले नाही की मी किंवा दुसरा कुणी 75 वर्षे पूर्ण झाल्यावर निवृत्त व्हावा. संघ जे सांगेल ते आम्ही करतो. कोणतेही काम नाकारण्यासाठी वय कारण ठरू शकत नाही.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, संघात जबाबदारी दिली जाते ती स्वीकारणे अनिवार्य आहे, हवी की नको, याचा संबंध नसतो. जरी मी 80 वर्षांचा असलो तरी संघाने जर शाखा चालवायला सांगितले, तर मला ते करावेच लागेल, असे त्यांनी सांगितले. जुलै महिन्यात मोरोपंत पिंगळे यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात भागवत म्हणाले होते, जेव्हा पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते, तेव्हा त्या वेळेला थांबण्याची वेळ येते, अशी आठवण त्यांनी दिली होती. हे विधान चुकीच्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीशी जोडले गेले.
संघ-भाजप संबंधावरही त्यांनी भाष्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सत्ताधारी भाजपा सरकार यांच्यात मतभेद असू शकतात, पण भांडण नाही. भागवत म्हणाले, कुठेही भांडण नाही, परंतु सर्व मुद्द्यांवर एकमत असणे शक्य नाही. आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवतो. मी ‘शाखा’ चालवण्यात तज्ज्ञ आहे, भाजपा सरकार चालवण्यात तज्ज्ञ आहे. त्यामुळे आम्ही फक्त सूचना देऊ शकतो. यावेळी लोकसंख्या धोरणावर मोठे विधान करताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, ‘हम दो हमारे तीन’ हे धोरण असले पाहिजे. भागवत म्हणाले की, तज्ञांचे म्हणणे आहे की तीनपेक्षा कमी जन्मदर असलेले समुदाय हळूहळू नामशेष होत आहेत. प्रत्येक जोडप्याने राष्ट्राच्या हितासाठी तीन मुले जन्माला आणली पाहिजेत. त्यांचे संगोपन योग्य प्रकारे व्हावे. लोकसंख्येतील असंतुलन हा धर्मांतरामुळे होतो, जे भारतीय परंपरेचा भाग नाही. ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदाय देखील धर्मांतरास विरोध करतात, असे भागवत म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button