काँग्रेसने कधीही धर्माच्या नावाखाली मते मागितली नाहीत

काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहणार्‍यांना खर्गेंचे आव्हान

* काँग्रेसच्या स्थापना दिना भाजपवर निशाणा

नवी दिल्ली/28 डिसेंबर  : अनेकदा काँग्रेसवर त्यांच्या विरोधकांकडून सातत्याने टीका केली जाते. भाजपसह अनेकांनी काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा अनेकदा केली आहे. तर, अनेकदा काँग्रेस संपल्याचेही म्हटले आहे. या अशा टीकाकारांना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रत्युत्तर केले आहे. काँग्रेसच्या 140 व्या स्थापना दिनानिमित्तच्या भाषणात ते म्हणाले की, काँग्रेस संपली म्हण णार्‍यांनी हे समजून घेतले पाहिजे, आमची शक्ती कमी झाली असेल किंवा आमच्या सत्ता नसेल पण आमचा कणा अजूनही ताठ आहे. अशा शब्दात त्यांनी भाजप आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच, काँग्रेसने कधीही सत्तेसाठी सौदेबाजी केलेली नाही. तसेच, संविधान, धर्मनिरपेक्षता किंवा गरिबांच्या हक्कांशी तडजोड केली नाही. असेही ते पुढे म्हणाले. विरोधकांवर टीका करताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, काँग्रेसमुक्त भारत करण्याची स्वप्न काही लोक पाहत आहेत. काँग्रेस संपली आहे असे म्हणणार्‍यांना मी सांगू इच्छितो की, आमच्याकडे सामर्थ्य, बळ किंवा सत्ता काही प्रमाणात कमी असू शकते. पण आमचा पाठीचा कणा अजूनही ताठ आहे. आम्ही सत्तेसाठी कुणापुढे झुकलेलो नाही. आम्ही सत्तेत नसलो तरी आम्ही सौदेबाजी करणार नाही. काँग्रेसने कधीही धर्माच्या नावाखाली मते मागितली नाहीत. मंदिरे आणि मशिदींच्या नावाखाली द्वेष पसरवला नाही. तसेच, काँग्रेस नेहमी जोडण्याचे आणि एकत्र येण्याचे काम करते. तर भाजप तोडण्याचे आणि फोडाफोडीचे राजकारण करते. काँग्रेसने नेहमीच धर्माला श्रद्धेपुरते मर्यादित ठेवले. पण, काही लोकांनी त्याचा वापर राजकारणातील शस्त्र म्हणून केला आहे. आज भाजपकडे सत्ता आहे, पण सत्य नाही. म्हणूनच कधी डेटा लपवला जातो, कधी जनगणना थांबवली जाते, तर कधी संविधान बदलण्याची चर्चा होते. असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली-भाषणामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, काँग्रेस पक्षाची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत झाली. 62 वर्षे लाखो काँग्रेस सदस्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला, बलिदान दिले, तुरुंगात कठोर छळ सहन केला आणि त्यानंतरच देशाला स्वातंत्र्य मिळाले. काँग्रेस पक्षाच्या सर्व संस्थापकांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना मी आदरांजली वाहतो. संविधान आणि मजबूत लोकशाही स्थापन करणार्‍या वीरांना अभिवादन करत असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button