अमेरिकन उपराष्ट्रपतींचा फोन आला, पण निर्णय आमचाच होता
-‘सीसफायर’ बाबत मोदींचं लोकसभेत स्पष्ट उत्तर

-विरोधकांवर पलटवार, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
नवी दिल्ली/ 29 जुलै : पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही खळबळ उडाली होती. या संदर्भात सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जोरदार चर्चा रंगली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत उभं राहून या सर्व प्रकरणावर थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली.
कश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाची लष्करी कारवाई आखली आणि त्याअंतर्गत पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात लक्ष्यावर अचूक मिसाईल हल्ला केला. या कारवाईनंतर दोन्ही देशांच्या सीमारेषांवर प्रचंड तणावाचे वातावरण होते, आणि संभाव्य युद्धाची शक्यता जगभर चर्चेचा विषय ठरली.
दरम्यान, त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांसमोर सांगितले की, त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरच नाही, तर भारताच्या संसदेतही वादंग निर्माण झाला. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना थेट आव्हान देत विचारले की, जर कोणीतरी हस्तक्षेप केला असेल, तर त्याचं नाव स्पष्टपणे घ्या. हिंमत असेल तर ट्रम्प यांचं नाव घ्या.
राहुल गांधी यांच्या या आव्हानाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आपली भूमिका ठामपणे मांडली. त्यांनी सांगितलं की, ऑपरेशन सिंदूर थांबवण्याचा निर्णय पूर्णपणे भारत सरकारचा होता. यामध्ये कोणत्याही जागतिक नेत्याने हस्तक्षेप केला नाही. हे मी संपूर्ण जबाबदारीने सांगतो. मोदींनी असंही स्पष्ट केलं की, 9 मे रोजी अमेरिकेचे उपराष्ट्रपती सतत संपर्क साधत होते. तीन-चार वेळा त्यांनी फोन केला, त्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यावर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, जर तसं काही घडलं, तर भारत त्यापेक्षाही मोठा हल्ला करेल. आम्ही गोळीला उत्तर गोळीनेच देणार.
पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर लोकसभेत सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी बाकं ठोठावून ’मोदी मोदी’ अशा घोषणा दिल्या. सभागृहात वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांनी पुन्हा काही मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, पण मोदींच्या उत्तरामुळे सत्ताधार्यांच्या बाजूने जोरदार उत्साह दिसून आला.
-22 एप्रिलचा 22 तासांत बदला
22 एप्रिलच्या हल्ल्याचा बदला 22 मिनिटांत घेतल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पाकिस्तानचे अनेक हवाई तळ निष्क्रिय केले गेले, दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर कारवाई करून पाकिस्तानच्या अणुबॉम्ब धमक्यांना पोकळ ठरवलं, गेलं असं ते म्हणाले. काँग्रेसवर मोदींनी टीका केली. काँग्रेसने कारवाईवेळी ‘बालिशपणा’ दाखवला, भारतीय लष्कराच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम करणारी विधाने केली, देशाच्या 190 राष्ट्रांकडून पाठिंबा मिळाला, पण काँग्रेसकडून नाही, असा आरोप त्यांनी केला. दहशतवाद संपवणे हाच राष्ट्रीय संकल्प असल्याचे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. जनतेच्या समर्थनाबद्दल देशवासीयांचे ऋण मी मानतो, अशा शब्दात त्यांनी आभार व्यक्त केले.




