भीषण अपघातात दोन लहान मुलांसह सात जणांचे मृत्यू

जयपूर / 14 सप्टेंबर : राजस्थानच्या जयपूरमधील वाटिका रिंग रोडवर आज दुपारी भीषण अपघात घडला. हरिद्वारहून अस्थी विसर्जनाची विधी आटोपून परतणार्‍या एका कुटुंबाच्या कारला जबर अपघात झाला. या घटनेत दोन लहान मुलांसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली.
चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी अनियंत्रित होऊन उलटली आणि क्षणात सर्वस्व गमवावे लागले. या कारमध्ये एकूण सात जण प्रवास करत होते. अपघातात दोन लहान मुले, दोन महिला आणि तीन पुरुष असे मिळून सर्वांचा मृत्यू झाला. सदर कुटुंब काही दिवसांपूर्वी निधन झालेल्या आप्ताचे अस्थी विसर्जन करण्यासाठी हरिद्वारला गेले होते. विधी पार पाडल्यानंतर ते जयपूरकडे परतत असताना हा अपघात झाला. आनंदाश्रूंनंतर या कुटुंबावर काळाने टाकलेला हा घाला अत्यंत हृदयद्रावक असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ माजला. उपस्थित ग्रामस्थ आणि स्थानिकांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. सर्व मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी कळवले.

संबंधित बातम्या

Back to top button