शाळा, मैदान परिसरातील भटके कुत्रे हटवा

सुप्रीम कोर्टाचा श्वानप्रेमींना दणका

* राज्यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश

नवी दिल्ली/7 नोव्हेंबर : सुप्रीम कोर्टाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. देशभरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, क्रीडा संकुले, बस स्थानके, डेपो आणि रेल्वे स्थानक या सर्व परिसरातून भटक्या कुत्र्यांना ‘तत्काळ’ हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच रस्त्यावरील गायी-म्हशींच्या वावरावरही बंदी घालण्यात आली आहे. पुढील आठ आठवड्यांत हे काम पूर्ण करण्याचे न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले असून, एका वरिष्ठ अधिकार्‍याला तीन महिन्यांत रस्त्यावरील सर्व कुत्रे हटवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
शुक्रवारी न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. कोर्टाने शैक्षणिक संस्था, सार्वजनिक वाहतूक केंद्रे आणि आरोग्यसेवेशी संबंधित संवेदनशील ठिकाणे भटक्या कुत्र्यांपासून तात्काळ मुक्त करण्यावर जोर दिला आहे.
खंडपीठाने स्पष्ट केले की ज्या ठिकाणांवरून हे कुत्रे उचलले जातील, त्या ठिकाणी त्यांना परत सोडले जाणार नाही. कोर्टाने राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना दोन आठवड्यांच्या आत त्यांच्या प्रादेशिक मर्यादेत असलेल्या सर्व शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालये, सार्वजनिक क्रीडा संकुले, बस स्थानके, डेपो आणि रेल्वे स्थानके ओळखण्यास सांगितले आहे. या सर्व ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या आणि स्थितीची नोंद घेऊन तात्काळ कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मानवीय पद्धतीने आश्रयस्थाने उभार-कोर्टाने तातडीने कुत्र्यांसाठी आश्रयस्थाने उभारण्याची गरज अधोरेखित केली असून, पहिल्या टप्प्यात सहा ते आठ आठवड्यांत किमान 5,000 कुत्र्यांच्या क्षमतेची आश्रयस्थाने तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या आश्रयस्थानांमध्ये मानवीय परिस्थिती, अन्न-पाणी, वैद्यकीय सेवा आणि स्वच्छता यांची हमी दिली जावी, असे न्यायालयाने सांगितले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button