राहुल गांधींच्या व्होटर अधिकार यात्रला बिहारमध्ये प्रारंभ

ही संविधान वाचवण्याची लढाई

-महाराष्ट्रातील मतचोरीचे उदाहरण
-बिहारमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न
सासाराम  / 17 ऑगस्ट : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज बिहारमधील सासाराम येथून त्यांच्या व्होटर अधिकार यात्रा ला सुरुवात केली. यात्रा 1 सप्टेंबरपर्यंत चालणार असून, सुमारे एक हजार किलोमीटर प्रवास यामध्ये समाविष्ट आहे. राहुल गांधी यांनी भाषणात म्हटले, ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. मतचोरी करून भाजप निवडणुका जिंकत आहे. त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील अनुभव उदाहरण म्हणून दिला. त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकली; मात्र चार महिन्यांनंतर विधानसभा निवडणुकीत भाजपने मतचोरी करून विजय मिळवला.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरोधात आरोप करत म्हटले की, आयोग बनावट मतदार नोंदणी करून भाजपला मदत करीत आहे. याविरोधात जनजागृती करण्यासाठी ही यात्रा सुरू करण्यात आली आहे. सासाराम हे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचे गाव असून, देशाच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचा लोकसभा मतदारसंघ येथे आहे. राहुल गांधी म्हणाले, लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात एक कोटी मतदार वाढले. आमच्या आघाडीला लोकसभेत जसे मतदान झाले, तेवढेच मतदान विधानसभेत झाले, पण ते मतदान भाजपकडे गेले. त्यांनी निवडणूक आयोगाला व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि आकडेवारीची मागणी केली, मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले, कर्नाटकातही असेच झाले. एका लोकसभेत भाजपला एक लाख मते जास्त मिळाली आणि त्यांचा विजय झाला. निवडणूक आयोगाकडे आम्ही सीसीटीव्ही आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितले, परंतु नकार आला. राहुल गांधी यांनी बिहारच्या जनतेस उद्देशून आवाहन केले, बिहारमध्ये आम्ही मतचोरी होऊ देणार नाही. गरीबांचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहील. मतचोरीचा कोणताही प्रयत्न केला तर आम्ही जनतेसमोर आणू.

संबंधित बातम्या

Back to top button