प्रियंका गांधी-प्रशांत किशोर यांच्यात भेट
बंद दाराआड 2 तास चर्चा

नवी दिल्ली/15 डिसेंबर : निवडणूक रणनीतीकारक ते राजकीय नेते असा प्रवास करणारे प्रशांत किशोर पुन्हा एकदा चर्चेत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जन सुराज पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. बहुतांश उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर प्रशांत किशोर पुन्हा सक्रिय झाले आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी नुकतीच काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांची भेट घेतली. दोघांमध्ये बंद दाराआड दोन तास चर्चा झाली. या बैठकीत उत्तर प्रदेश आणि बिहार या उत्तर भारतातील सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे. प्रियांका गांधी आणि प्रशांत किशोर यांची भेट केवळ औपचारिक असल्याचं सांगून दोन्ही बाजूंकडून चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न होत आहे. पण राजकीयदृष्ट्या ही भेट महत्त्वाची आहे. कारण गेल्या काही वर्षांत प्रशांत किशोर आणि काँग्रेस यांचे संबंध कटू राहिले आहेत. प्रशांत किशोर यांची 2021 मध्ये जेडीयूमधून हकालपट्टी झाली. यानंतर वर्षभरानं त्यांनी काँग्रेसला पुनरुज्जित करण्याचा प्रस्ताव दिला. त्यासाठी 2022 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वासोबत चर्चा सुरु केली. एप्रिल 2022 मध्ये सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी प्रशांत किशोर यांनी राहुल आणि प्रियांका यांच्यासह पक्ष नेतृत्त्वासमोर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दिलं.




