भारत-रशिया संबंध बळकट करण्यासाठी आराखडा जाहीर

मैत्री-व्यापार, शिक्षण, पर्यटनासह विविध करारांवर चर्चा

* पीएम मोदी आणि पुतीन यांची बैठक

नवी दिल्ली/5 डिसेंबर – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे तब्बल 4 वर्षांनंतर भारत दौर्‍यावर आले. दिल्लीत त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीनंतर नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, भारत रशिया संबंधाचा पुढील प्रवास अधिक मजबूत होईल. दोन्ही देशांनी परस्पर व्यापार वाढवण्याचा निर्धार केला आहे. लवकरच 2030 पर्यंतचा व्यापार आराखडा तयार करण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ’युक्रेन मुद्द्यावर भारत आणि रशियामध्ये चर्चा झाली आहे. भारत कोणत्याही एका देशाच्या बाजूने नसून, शांतीचा समर्थक आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, ही भारताची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं’. ’आतंकवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका असून, या लढ्यात भारत आणि रशिया दोन्ही देश एकमेकांना पाठिंबा देतील’, असं त्यांनी सांगितलं.
व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत रशिया संबंधांना नवीन उंचीवर नेण्याबद्दल सांगितले. तसेच त्यांनी अनेक प्रमुख मुद्द्यांवर विस्तृतपणे भाष्य केले. यांसह अनेक प्रमुख घोषणाही केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ’भारत – रशिया संबंध नेहमीच ऊर्जा आणि सुरक्षेच्या बाबतीत महत्त्वाचे राहिले आहेत. यापुढेही मजबूत राहतील’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी ’दोन्ही देशांचे संबंध संस्कृतीत खोलवर रूजलेले आहेत’, असं सांगितलं. ’आता भारतात 2 नवीन रशियन काउंसलेट उघडल्याने लोकांमधील संपर्क आणि देवाणघेवाण आणखी वाढेल’, असंही मोदींनी स्पष्ट केलं.

सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प उभारणार

भारत दौर्‍यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतासाठी आणखी एक भेट जाहीर केली आहे. पुतिन यांनी भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प, कुडनकुलम पूर्ण क्षमतेने उभारण्यासाठी एक मोठी अणुप्रतिबद्धता व्यक्त केली आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पुतिन यांनी सांगितले की, रशिया कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण क्षमतेने उभारण्यासाठी भारतासोबत काम करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे.

संबंधित बातम्या

Back to top button