‘ऑपरेशन सिंदूर’वर विरोधकांच्या प्रश्नांच्या फैरी झडणार
आज लोकसभेत, उद्या राज्यसभेत चर्चा

नवी दिल्ली / 27 जुलै : लोकसभेत सोमवारी ‘ऑपरेशन सिंदूर’ या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगानं भारतानं दिलेल्या लष्करी कारवाईच्या प्रत्युत्तरासंदर्भात सांगोपांग चर्चा अपेक्षित आहे. लोकसभेनं जारी केलेल्या कामकाजाच्या सूचनेच्या यादीनुसार, सुरुवातीचा आठवडा तहकूब झाल्यानंतर, संसदेच्या कनिष्ठ सभागृहात अर्थात लोकसभेत देशाच्या मजबूत, यशस्वी आणि निर्णायक ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याने मोठा व्यत्यय आला. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सोमवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि भाजपा खासदार अनुराग ठाकूर आणि निशिकांत दुबे हे देखील लोकसभेतील चर्चेत भाग घेण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेतील चर्चेत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. ते राज्यसभेतील चर्चेत देखील सहभागी होऊ शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूरवर मंगळवारपासून राज्यसभेत चर्चा सुरू होईल. राज्यसभेत होणार्या चर्चेत भाग घेणार्या मंत्र्यांमध्ये राजनाथ सिंह आणि एस जयशंकर हे सहभागी होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत टीडीपीचे लवू श्री कृष्ण देवरायलू आणि जीएम हरीश बालयोगी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी सांगितलं की पक्षाला 30 मिनिटे देण्यात आली आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि खासदार राजीव राय चर्चेत सहभागी होतील.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं की, ऑपरेशन सिंदूरवरील चर्चा 28 जुलै रोजी लोकसभेत 16 तास आणि 29 जुलै रोजी राज्यसभेत 16 तास चालेल. सर्व मुद्द्यांवर एकत्र चर्चा करता येणार नाही. विरोधकांनी बिहारमधील विशेष सघन सुधारणा (डखठ) सराव आणि इतर अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. आम्ही त्यांना सांगितले आहे की ऑपरेशन सिंदूरवर आधी चर्चा केली जाईल. त्यानंतर कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची हे आम्ही ठरवू.
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्ष करत आहेत आणि भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदी घडवून आणल्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वारंवार केलेल्या दाव्यांवर सरकारचे स्पष्टीकरण विरोधकांनी मागितले आहे. चर्चेदरम्यान विरोधी पक्ष पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीची मागणी करत होते. पंतप्रधान मोदी या आठवड्यात दोन देशांच्या दौर्यावर परदेशात गेले असल्याने, पुढील आठवड्यात चर्चा नियोजित करण्यात आली आहे. याशिवाय, इंडिया ब्लॉक पक्षांचे नेते सोमवारी सकाळी 10 वाजता पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्या आठवड्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी भेटतील. लोकसभेत सोमवारी आणि राज्यसभेत मंगळवारी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे.




