ऑपरेशन ब्लू स्टार हा ‘चुकीचा निर्णय’ होता

त्याची किंमत इंदिराजींना मोजावी लागली

* पी. चिदंबरम यांचे खळबळजनक वक्तव्य

नवी दिल्ली/12 ऑक्टोबर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी ऑपरेशन ब्लू स्टारबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की, ऑपरेशन ब्लू स्टार ही मोठी चूक होती आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्या चुकीची किंमत आपल्या जीवाने चुकवावी लागली. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना हुसकावण्यासाठी लष्करी कारवाई करणे चुकीचे होते, असेही चिदंबरम यांनी स्पष्ट केले. हिमाचल प्रदेशातील कुसोली येथील खुशवंत सिंग साहित्य महोत्सवात त्यांनी हे विधान केले. चिदंबरम यांनी फक्त इंदिरा गांधींना दोष देणे चुकीचे असल्याचेही सांगितले आणि ऑपरेशन ब्लू स्टार ही एक गंभीर चूक होती, ज्याची किंमत तत्कालीन पंतप्रधानांनी आपल्या जीवाने भोगली. पत्रकार हरिंदर बावेजा यांच्या “दे विल शूट यू, मॅडम” या पुस्तकावरील चर्चेत बोलताना चिदंबरम म्हणाले की, कोणत्याही आर्मी अधिकार्‍याचा अथवा कारवाईचा अनादर करायचा नाही, पण सुवर्ण मंदिर पुन्हा ताब्यात घेण्याचा मार्ग चुकीचा होता. काही वर्षांनंतर योग्य मार्गाने सैन्याला बाहेर ठेवून सुवर्ण मंदिर पुन्हा ताब्यात घेतले गेले. ब्लू स्टार हा चुकीचा मार्ग होता; तथापि, ही कारवाई सेना, पोलीस, गुप्तचर आणि नागरी सेवेचा संयुक्त निर्णय असल्यामुळे फक्त इंदिरा गांधींना पूर्णपणे जबाबदार धरता येणार नाही, असेही चिदंबरम यांनी स्पष्ट केले.

* काँग्रेस नेतृत्व नाराज

चिदंबरम यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजी निर्माण झाली आहे. अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या विधानाचा
निषेध केला असून, काहींनी ते ‘भाजपसारखे बोलत आहेत,’ असा आरोप केला आहे. पक्षात अशीही भावना आहे की, चिदंबरम यांच्या विधानामुळे भाजपला काँग्रेसविरोधी राष्ट्रवादाच्या प्रचारासाठी नवे हत्यार मिळाले आहे. काँग्रेस नेतृत्व ‘अतिशय अस्वस्थ’ असल्याचे समजते. पक्षाच्या काही नेत्यांनी खासगीपणे तर काहींनी माध्यमांसमोर विरोध दर्शवला. भाजपने काँग्रेसवर ‘राष्ट्रवादविरोधी’ असल्याचा आरोप केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button