नितीश कुमार 10 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री
भाजपाचे सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा उपमुख्यमंत्री

* मंत्रिमंडळात 26 सदस्यांचा शपथविधी
* मोहम्मद जामा खान एकमेव मुस्लिम चेहरा
पाटणा/21 नोव्हेंबर -नितीशकुमार यांचे नवे सरकार आकारास आले आहे. गुरुवारी, ऐतिहासिक गांधी मैदानात नितीशकुमार यांनी 10 व्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील 26 सदस्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. नितीशकुमार यांच्या टीममधील मोहम्मद जामा खान हे एकमेव मुस्लिम चेहरा आहेत.
या निवडणुकीत मोठा भाऊ ठरूनही भाजपाने जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान केले आहे. त्यामुळे नितीश कुमारांनी इतिहास रचत 10 व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर भाजपाचे सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मोहम्मद जामा खान यांनी दुसर्यांदा कैमूर जिल्ह्यातील चैनपूर जागा जिंकली, त्यांनी राजदचे ब्रिज किशोर बिंद यांना 8,362 मतांनी पराभूत केले. जामा खान बिहारच्या मागील सरकारमध्ये अल्पसंख्याक व्यवहार मंत्री देखील होते. पहिल्यांदाच जेदयूच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे जामा खान पूर्वी बहुजन समाज पक्षाचे नेते होते. त्यांनी 2020 ची निवडणूक हत्तीच्या चिन्हावर जिंकली, परंतु नंतर जेदयूमध्ये सामील झाले आणि नितीश सरकारमध्ये त्यांना मंत्री बनवण्यात आले. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने 202 जागा जिंकल्या. मोहम्मद जामा खान हे त्यापैकी एकमेव मुस्लिम आमदार आहेत. बिहारमध्ये पाच जागांवर जेदयूने मुस्लिम उमेदवार उभे केले होते, तर भाजपाने एकही मुस्लिम उमेदवार उभा केला नव्हता. यावेळी, बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण 11 मुस्लिमांनी विजय मिळवला, ज्यामध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाच्या एआयएमआयएमचे सर्वाधिक उमेदवार होते. पाटण्यातील गांधी मैदानावर आज गुरुवारी (ता. 20 नोव्हेंबर) नितीश कुमार आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी शपथ घेतली. यावेळी मोठ्या संख्येने लोक या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या सोहळ्याला गेले होते. सुरुवातीला नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजपाचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर एनडीए सरकारमधून एकूण 26 मंत्र्यांनी शपथ घेतली, ज्यात जमुईच्या आमदार श्रेयसी सिंह यांचा समावेश आहे. या शपथ विधीसोहळ्यासाठी आज सकाळपासूनच पाटण्यातील गांधी मैदानावर लोकांची गर्दी जमू लागली होती. विविध जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने लोक पाटण्यात दाखल झाले होते. जय बिहार आणि नितीश कुमार झिंदाबाद अशा घोषणा यावेळी उपस्थितांकडून देण्यात आल्या. यावेळी समर्थकांनी नेत्यांचे स्वागत करण्यासाठी हवेत रुमाल फडकावले.




