मोदींनी दिले पूरग्रस्तांना भरघोस मदतीचे ओशासन
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट

* राज्यातील पूरस्थिती, संरक्षण कॉरिडॉर आणि ‘पोलाद सिटी’सह अनेक विषयावर चर्चा
नवी दिल्ली/26 सप्टेंबर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गंभीर पूरस्थिती पाहायला मिळत आहे. शेकडो एकरवरील शेतीचं या पावसामुळे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौर्यावर आहेत. या दौर्यावेळी फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल फडणवीसांनी माहिती दिली आहे. यावेळी पंतप्रधानांकडून मदतीचे आश्वासन मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधानांना मी एक निवेदन दिले आहे. त्यांना एकूण महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची कल्पना दिली आणि कशापद्धतीचं नुकसान झालं आहे त्याबद्दल सांगितलं. त्यांनी विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत करा. पंतप्रधानांनी सकारात्मकता दाखवली असून सांगितले की, लवकरात लवकर प्रस्ताव येऊ द्या, प्रस्ताव आला की त्यावर कारवाई केली जाईल. शक्य तेवढ्या जास्त मदतीचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दहीसर येथील जागेचे हस्तांतरण दहीसर पूर्व येथील 58 एकर जागेची मालकी ही भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे आहे. या जागेचे मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीएला हस्तांतरण करण्याचा आधी निर्णय झाला होता, परंतु डिझाईनमध्ये झालेल्या बदलांमुळे एमएमआरडीएने माघार घेतली. या जागेची मागणी आता मुंबई महापालिकेने केली आहे. या भागात एचएफ रिसिव्हींग स्टेशन असल्याने या भागाचा संपूर्ण विकास खोळंबला आहे. हे हस्तांतरण झाल्यास या जागेचा सार्वजनिक उपयोग आणि विकासासाठी करता येईल. यामुळे उंचीचे प्रश्न सुद्धा सुटतील. त्यामुळे ही जागा मुंबई महापालिकेला देण्यात यावी, अशी मागणी या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
* राज्यात डिफेन्स कॉरिडॉर
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील काही प्रकल्पाबद्दल पंतप्रधान मोदी यांच्यासमोर सादरीकरण केल्याचे सांगितले. ते म्हणाले की, याव्यतिरिक्त महाराष्ट्र डिफेन्स कॉरिडॉरच्या संदर्भात देखील त्यांनी प्रेझेंटेशन केले आहे, ज्याद्वारे पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिले की, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगची एक इकोसिस्टम महाराष्ट्रात तयार होत आहे. यामुळे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट मिळेल, अर्थव्यवस्थेला फायदा होईल आणि रोजगार निर्मिती होईल. तसेच, तीन ठिकाणी हा कॉरिडॉर करता येईल हे त्यांनी दाखवले आहे.




