मारिया कोरिना मचाडो शांततेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का

* 20 वर्षांपासून लोकशाहीसाठी लढा
नवी दिल्ली/10 ऑक्टोबर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धासह सात युद्धे थांबवली असल्यामुळे यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना मिळावा, असे विधान केले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार नेमका कोणाला मिळणार आणि ट्रम्प यांना तो पुरस्कार मिळणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पण आता या पुरस्काराची घोषणा झाली असून ट्रम्प यांना धक्का बसला आहे, कारण यंदा हा पुरस्कार मारिया कोरिना मचाडो या महिलेला जाहीर करण्यात आला आहे.
नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारासाठी एकूण 338 उमेदवार रिंगणात होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःसाठी हा पुरस्कार मागितला होता, ज्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती. परंतु नोबेल समितीने व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांची निवड करत त्यांना हा पुरस्कार दिला. नोबेल समितीने स्पष्ट केले की, लोकशाही हक्कांसाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांसाठी, हुकूमशाहीपासून शांततापूर्ण लोकशाहीकडे संक्रमण करण्यासाठीच्या संघर्षासाठी मारिया कोरिना मचाडो यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना पुरस्कार मिळावा यासाठी आठ देशांनी पाठिंबा दिला होता, ज्यात पाकिस्तान, इस्रायल, अमेरिका, आर्मेनिया, अझरबैजान, माल्टा आणि कंबोडिया यांचा समावेश होता. मारिया कोरिना मचाडो यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1967 रोजी व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे झाला. त्यांनी आंद्रेस बेलो कॅथोलिक विद्यापीठातून इंजिनिअरिंग आणि इन्स्टिट्यूटो डी एस्टुडिओस सुपीरियर्स डी अॅडमिनिस्ट्रेसिओनमधून वित्त विषयात पदवी प्राप्त केली. त्या व्हेनेझुएला पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक आहेत. 2018 मध्ये बीबीसीच्या 100 सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये आणि 2025 मध्ये टाइम मासिकाच्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झाला होता. निकोलस मादुरो सरकारने त्यांना देश सोडण्यास बंदी घातली होती, पण मारिया यांनी दडपशाही करणार्या शासनाला आव्हान देताना धमक्या, अटक आणि राजकीय छळ यांचा सामना केला. त्यांच्या या कामगिरीसाठी लोकशाही हक्कांसाठीच्या प्रयत्नांसाठी त्यांना यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.
* ‘सुमाते’ संस्थेच्या संस्थापिका
व्हेनेझुएलाची हुकूमशाही राजवट राजकीय कार्य अत्यंत कठीण करते. लोकशाही विकासासाठी समर्पित असलेल्या ‘सुमाते’ या संस्थेच्या संस्थापिका म्हणून, माचाडो यांनी 20 वर्षांपूर्वी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी आवाज उठवला. राजकीय पदावर असताना आणि त्यानंतर संस्थांना दिलेल्या त्यांच्या सेवेत माचाडो यांनी न्यायालयीन स्वातंत्र्य, मानवी हक्क आणि लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी सतत आवाज उठवला आहे. त्यांनी व्हेनेझुएलाच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वर्षे कार्य केले आहे.




