गुजरातच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल

19 नव्या मंत्र्यांना संधी, रिवाबा जडेजा यांची मंत्रीपदी वर्णी

अहमदाबाद/17 ऑक्टोबर – गुजरातच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मोठा फेरबदल केला आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या निवासस्थानी आज एकूण 21 मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यापैकी दोन आधीचेच मंत्री आहेत, तर 19 नव्या चेहर्‍यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा उपस्थित होते. गुजरातच्या एकूण मंत्रिमंडळाची संख्या आता 26 झाली आहे, यामध्ये मुख्यमंत्र्यांचा समावेशही आहे. विधानसभेतील सदस्यसंख्या 182 असून सभागृहाच्या सदस्यसंख्येच्या 15 टक्के म्हणजे 27 मंत्री असू शकतात. गुजरातमध्ये 2027 साली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तर पुढील महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत, त्याच्या काही वेळ आधी मंत्रिमंडळात हा मोठा फेरबदल करण्यात आला आहे.

या बदलात 40 वर्षीय हर्ष सिंघवी यांना उपमुख्यमंत्री बनविण्यात आले आहे. हा फेरबदल मंत्रिमंडळातील सर्वात मोठा बदल मानला जातो. राजीनामा देण्यापूर्वी त्यांच्याकडे गृह मंत्रालयाचा कारभार होता. आदल्या दिवशी त्यांनी सर्व मंत्र्यांसह राजीनामा दिला होता, परंतु दुसर्‍या दिवशी त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. हर्ष सिंघवी 2012 साली अवघ्या 27 वर्षांच्या वयात सूरत जिल्ह्यातील माजुरा विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते आणि 2021 साली त्यांना पहिल्यांदा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती.

संबंधित बातम्या

Back to top button