बिहार निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर

महाराष्ट्रातील 3 नेत्यांवरही मोठी जबाबदारी

* मोदी, शहांसह फडणवीसांचाही समावेश

नवी दिल्ली/16 ऑक्टोबर : बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस, जदयू, लोक जनशक्ती पार्टी, एमआयएम आणि डावी आघाडी यांसह विविध पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. भाजपाने आतापर्यंत उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या असून आता पक्षाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपाच्या एकूण 40 नेतेमंडळींचा समावेश आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यावर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून ते 17 ऑक्टोबर रोजी बिहारसाठी रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत राजकीय रंग चढू लागला असून प्रचाराचा वेगही वाढला आहे. भाजपाने अनेक प्रभावी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत आणि आता स्टार प्रचारकांच्या माध्यमातून निवडणुकीची रंगत वाढवण्याचे काम केले आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा, मोहन यादव, स्मृती इराणी, केशव प्रसाद मौर्य, सी. आर. पाटील, पवन सिंह, मनोज तिवारी आणि रवि किशन यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावे आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा या यादीत समावेश झाल्याने ते लवकरच बिहारमध्ये प्रचारसभांमध्ये सहभागी होणार आहेत आणि नितीश कुमार यांच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि विनोद तावडे या तिघांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तीन प्रमुख नेते बिहार निवडणुकीत प्रचार करताना दिसणार आहेत. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह पाच राज्यांचे मुख्यमंत्री या निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button