अहमदाबाद विमान अपघातातील तो अहवाल विना सहीचाच?
पायलट असोसिएशनने घेतला आक्षेप

-गोपनिय अहवाल लिक होण्यावर प्रश्नचिन्ह
नवी दिल्ली/ 12 जुलै : एअर इंडियाच्या विमानाचा अहमादबादमध्ये अपघात झाला होता. या अपघाताचा पहिला अहवाल समोर आल्याचे पाहायला मिळाले. भारतीय विमान अपघात तपास संस्थेने सादर केलेल्या या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले. टेकऑफच्या काही सेकंदातच विमानाचे दोन्ही इंजिन अचानक बंद पडले होते. त्यामुळे विमानाची गती मंदावली आणि काही क्षणात विमान कोसळले, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पण आता हा गोपनीय अहवाल लीक झालाच कसा? असा सवाल एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाने उपस्थित केला आहे.
एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे की, तपासाचा सूर आणि दिशा पायलटच्या चुकीकडे कल दर्शवते. असोसिएशनने अहवालातील ही धारणा नाकारली असून निष्पक्ष, तथ्य-आधारित चौकशी करण्याची मागणी केली आहे. कोणत्याही जबाबदार अधिकार्याच्या स्वाक्षरीशिवाय किंवा माहितीशिवाय हा अहवाल माध्यमांना लीक करण्यात आला. तपासात पारदर्शकतेचा अभाव आहे कारण तपास गुप्ततेत गुंडाळला जात आहे, ज्यामुळे विश्वासार्हता आणि जनतेचा विश्वास कमी होत आहे. पात्र, अनुभवी कर्मचारी, खासकरून लाइन पायलट, यांना अजूनही तपास पथकात समाविष्ट केले जात नाही. असे त्यांचे म्हणणे आहे.
गेल्या महिन्यात 12 जून रोजी झालेल्या विमान अपघातात 260 जणांचा मृत्यू झाला. एअर इंडिया एआय 171 विमान अहमदाबादहून ब्रिटनमधील गॅटविक विमानतळावर जात होते. उड्डाण घेताच विमान कोसळले. सुरुवातीच्या अहवालात असे दिसून आले आहे की विमानाचे दोन्ही इंधन स्विच एकाच वेळी बंद पडले होते, ज्यामुळे इंजिनला इंधन मिळणे बंद झाले होते. एका पायलटटने विचारले होते की, फ्यूल का बंद केले आहे? यावर दुसर्या पायलटने उत्तर दिले होते, मी असं काहीही केलं नाही. या संवादाच्या काही सेकंदातच विमानाची स्पीड कमी होत गेली आणि पुढच्या काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या बिल्डिंगला जाऊन धडकले होते. भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे.




