तुमची मुलगी ऐकत नसेल तर पाय तोडा
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे बेताल वक्तव्य

नवी दिल्ली /19 ऑक्टोबर : भोपाळच्या माजी लोकसभा खासदार आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आल्या आहेत. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी भोपाळमध्ये आयोजित राष्ट्रीय हिंदू परिषद कार्यक्रमात बोलताना, त्यांनी मुलींचे संगोपन आणि लव्ह जिहाद यासारख्या मुद्द्यांवर आपले विचार मांडले. प्रज्ञा ठाकूर यांनी महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेवर भर दिला आणि पालकांनी लहानपणापासून मुलींवर संस्कार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. परंतु जर एखादी मुलगी संस्कारापासून विचलीत झाली असेल आणि एखाद्या बिगर हिंदूसोबत पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल, तर पालकांनी कठोर शब्दांत समज दिली पाहिजे; तसेच आवश्यक असल्यास मारहाण किंवा पाय तोडण्यासही मागेपुढे पाहू नका, असे बेताल वक्तव्य त्यांनी केले. प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, मुलगी जन्माला येते तेव्हा पालक तिला लक्ष्मी आणि सरस्वतीचे रूप मानतात, परंतु मोठी होत असताना स्वावलंबी होताना किंवा घरातून पळण्याचा विचार करताना पालकांनी तिच्यावर लक्ष ठेवावे आणि योग्य मार्गावर राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावर वाद निर्माण झाला असून विरोधकही आक्रमक झाले आहेत. भाजपाने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही, परंतु राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांच्या वक्तव्याला गंभीर मानून चौकशीची मागणी केली आहे. मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी ट्वीट करताना म्हटले की, प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानांमुळे भाजपाची मानसिकता दिसून येते आणि ते मुलींना संस्कार नव्हे तर हिंसाचार शिकवत आहेत. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही या वक्तव्याला ‘द्वेषपूर्ण भाषण’ म्हटले आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.




