गृह आणि वाहन कर्ज होणार स्वस्त

आरबीआयने रेपो दरात वर्षभरात चौथ्यांदा केली कपात

नवी दिल्ली/5 डिसेंबर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी करून 5.25 टक्के केला आहे. 3 ते 5 डिसेंबर दरम्यान झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दर कमी झाल्याची आज (5 डिसेंबर) घोषणा केली. त्यामुळे येत्या काळात कर्ज स्वस्त होतील.
आरबीआयने रेपो दरात कपात केल्यामुळे येत्या काळात गृह आणि वाहनांवर घेण्यात आलेले कर्ज 0.25 टक्क्यांनी स्वस्त होतील. नवीन कपातीनंतर 20 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या कर्जावरील ईएमआय 310 रुपयाने कमी होईल. त्याचप्रमाणे, 30 लाख रुपयांच्या कर्जावरील ईएमआय 465 रुपयांनी कमी होईल. रेपो दर कमी झाल्याने नवीन आणि विद्यमान ग्राहकांना याचा फायदा होताना दिसेल. महत्त्वाचे म्हणजे रेपो दर कमी केल्याने घरांची मागणी वाढेल. कारण बँका गृहनिर्माण आणि वाहन कर्जांसारख्या कर्जांवरील व्याजदर देखील कमी करतात. व्याजदर कमी केल्याने घरांची मागणी वाढेल. अधिक नागरीक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकतील, ज्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळेल. या वर्षी रेपो दर चार वेळा कमी झाला असून 1.25 टक्क्यांनी कपात झाली आहे. फेब्रुवारीच्या बैठकीत आरबीआयने व्याजदर 6.5 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत कमी केले होते. ही कपात जवळजवळ पाच वर्षांनी चलनविषयक धोरण समितीने केली होती. एप्रिलमध्ये दुसर्‍यांदा व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी करण्यात आला होता. तर जूनमध्ये तिसर्‍यांदा व्याजदरात 0.50 टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button