दिल्ली कार स्फोट प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक
‘एनआयए’च्या पथकाने जम्मू-काश्मीरमध्ये कारवाई

नवी दिल्ली/21 नोव्हेंबर -राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोटात सहभागी असलेल्या आणखी चार प्रमुख आरोपींना अटक केली आहे. यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची एकूण संख्या सहा झाली आहे. पटियाला हाऊस कोर्टाच्या जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या प्रॉडक्शन ऑर्डरवर एनआयएने जम्मू आणि काश्मीरमधून चार आरोपींना ताब्यात घेतले. एनआयएने आरोपींची ओळख पटवली आहे ते पुलवामा (जम्मू आणि काश्मीर) येथील रहिवासी डॉ. मुजम्मिल शकील गनई, अनंतनाग (जम्मू आणि काश्मीर) येथील रहिवासी डॉ. अदील अहमद राथेर, लखनऊ (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी डॉ. शाहीन सईद आणि शोपियां (जम्मू आणि काश्मीर) येथील रहिवासी मुफ्ती इरफान अहमद वागे अशी आहे. एनआयएच्या तपासानुसार, या सर्वांनी दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्यामुळे अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. तपासाला गती देत, एनआयएने आधीच दोन इतर आरोपींना अटक केली आहे: आमिर रशीद अली, ज्याच्या नावाने स्फोटात वापरलेली कार नोंदणीकृत होती आणि जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश, ज्याने या प्राणघातक हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याला तांत्रिक मदत केली. जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने गुरूवारी ‘काश्मीर टाइम्स’ या वृत्तपत्राच्या जम्मू येथील कार्यालयावर छापा टाकल्याची घटना समोर आली आहे. या छापेमारीदरम्यान एक एके रायफल्सची काडतुसे आणि पिस्तूलाचे राउंड्स आणि हँड ग्रेनेडच्या पिन्स जप्त करण्यात आल्या आहेत.




