सवाई मानसिंग रूग्णालयाला आग; 8 जणांचा मृत्यू
आग शॉर्ट सर्कीटमुळं लागली असण्याची शक्यता

नवी दिल्ली/6 ऑक्टोबर – जयपूर येथील सवाई मानसिंग रूग्णालयातील आयसीयूला रविवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. या आगीत आतापर्यंत 8 रूग्णांचा मृत्यू झाला असून 5 रूग्ण अत्यंत गंभीर स्थितीत आहेत. पोलिसांनी सांगितले की आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता आहे. जयपूर पोलीस कमिश्नर बिजू जॉर्ज जोसेफ यांनी म्हटले की, “प्राथमदर्शनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं दिसत आहे, मात्र एफएसएलच्या तपासणीनंतर नेमकं कारण समजू शकेल.”
सवाई मानसिंग रूग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरचे प्रमुख अनुराग धाकड यांनी सांगितले की, दुसऱ्या मजल्यावर असलेल्या ट्रॉमा आयसीयूलाच आग लागली. त्यांनी स्पष्ट केले की, ट्रॉमा सेंटरमध्ये दोन आयसीयू आहेत; दुसऱ्या मजल्यावरील ट्रॉमा आयसीयू आणि सेमी आयसीयूला आग लागली होती. त्या वेळी येथे 24 रूग्ण होते, ज्यात 11 ट्रॉमा आयसीयू आणि 13 सेमी आयसीयूमध्ये होते. ट्रॉमा आयसीयूमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग झपाट्यानं पसरली आणि विषारी वायूही निर्माण झाला.
धाकड यांनी सांगितले की, आयसीयूमधील अनेक रूग्ण कोमामध्ये होते. ट्रॉमा सेंटर टीम, नर्सिंग स्टाफ आणि वॉर्ड बॉय यांनी त्वरीत रूग्णांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवले. यातील सहा रूग्ण अतिशय गंभीर होते; त्यांना सीपीआर देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ते वाचू शकले नाहीत.




