ईडीचा लाचखोर उपसंचालक सीबीआयच्या जाळ्यात

20 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं

नवी दिल्ली/ 30 मे : केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) उपसंचालक चिंतन रघुवंशी यांना तब्बल 20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. या करावाईमुळे एकच खळबळ उडाली असून, या कारवाईकडे भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत एक मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. हे प्रकरण ओडिशामधील ढेंकनाल जिल्ह्यातील खाण व्यावसायिक रतिकांत राऊत यांच्या तक्रारीवर आधारित आहे.
राऊत यांनी आरोप केला की त्यांना ईडी कडून 2024 मध्ये एक समन्स आले होते, ज्यानंतर जानेवारी 2025 मध्ये त्यांच्या कार्यालयावर छापेमारी झाली. समन्सच्या उत्तरात जेव्हा मी ईडी कार्यालयात पोहचलो, तेव्हा चिंतन रघुवंशी यांनी चौकशी केली होती. काही कालावधीनंतर एका मध्यस्थीद्वारे रतिकांत राऊत यांच्याशी संपर्क साधला गेला आणि पाच कोटी रुपयांची लाच मागितली गेली. अनेकवेळा चर्चा झाल्यानंतर ही रक्कम दोन कोटी निश्चित झाली. ज्याअंतर्गत 28 मे रोजी 20 लाख रुपयांचा पहिला हप्ता मागितला गेला होता.
रतिकांत राऊत यांनी याबाबतची माहिती थेट सीबीआयला दिली. सीबीआयनेही योजनाबद्धरित्या सापळा रचला आणि जसं चिंतन रघुवंशी यांनी भुवनेश्वरच्या नयापल्ली येथील ईडी कार्यलयात पैसे स्वीकारले, तेव्हा त्यांना रंगेहाथ अटक केली गेली. अटकेनंतर तत्काळ आरोपी अधिकार्‍यास वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले गेले आणि नंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सीबीआयने त्यांच्या घर, कार्यालय आणि अन्य ठिकाणांवरही छापेमारी केली आणि या प्रकरणाची नोंद भ्रष्टाचार निवारण अधिनियमांतर्गत केली. आता पुढील अधिक तपास सुरू आहे, सीबीआयचा अंदाज आहे की या प्रकरणात आणखी काही नावंही समोर येवू शकतात.

संबंधित बातम्या

Back to top button