दिल्ली हादरली; लाल किल्ल्याजवळ स्फोटात 13 ठार
30 जण जखमी, दिल्ली आणि मुंबईत हाय अलर्ट

* पोलिसांचा तगडा बंदोबस्त झाडाझडती सुरु
* पीएम मोदींनी शहांशी साधला संवाद
* दहशतवादी हल्ल्याचा संशय
नवी दिल्ली/10 नोव्हेंबर – दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाल्याने घबराट पसरली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका कारचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. स्फोटानंतर 3 ते 4 वाहनांनाही आग लागली. दिल्ली अग्निशमन विभागाने सांगितले की, स्फोटात वाहनांचेही नुकसान झाले आहे. स्फोटाचे फोटो भयानक आहेत. 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर मुंबईत हाय अलर्ट जारी झाला आहे. सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ एका कारचा स्फोट झाल्याचे एका अधिकार्याने सांगितले. मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ ही घटना घडली. स्फोटानंतर इतर तीन ते चार वाहनांनाही आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. परिसराला वेढा घालण्यात आला आहे. अधिकार्याने सांगितले की, अग्निशमन विभागाला घटनेची माहिती सायंकाळी 7:05 वाजता मिळाली. दिल्लीचे पोलिस आयुक्त सतीश गोलछा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी सुमारे 6.52 वाजता लाल किल्ल्याजवळ एक संथ गतीने जाणारे वाहन लाल दिव्याजवळ थांबले. काही क्षणांतच त्या वाहनात जोरदार स्फोट झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे आसपास उभ्या असलेल्या इतर वाहनांचेही नुकसान झाले. सर्व तपास यंत्रणा, एफएसएल (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) आणि एनआयए (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या स्फोटात काही लोकांचा मृत्यू झाला असून काही गंभीर जखमी झाले आहेत. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. घटनेनंतर परिसर सील करण्यात आला असून रहदारी वळवण्यात आली आहे. बचावकार्य सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबाबत तातडीने माहिती घेतली असून दिल्ली पोलिस आणि तपास यंत्रणांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घटनेबाबत माहिती घेतली असून तातडीच्या कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. या स्फोटामुळे राजधानीत सुरक्षेची स्थिती तणावपूर्ण झाली आहे. लाल किल्ला परिसरातील सर्व प्रवेशद्वारांवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तपास यंत्रणा या स्फोटाचा दहशतवादी हल्ला म्हणून विचार करत असून प्राथमिक तपास सुरू असल्याचे सूत्रांकडून कळते.संध्याकाळी घडलेल्या या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे व्हायरल होत असून प्रशासन नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन करत आहे.
* 2 संशयित ताब्यात, चौकशी सुरु
दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्याजवळील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले. या कॅमेरात संशयित हालचाली करताना दिसणार्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लाल किल्ल्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरा हा उच्च रिझोल्यूशनचा आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची कसून चौकशी करण्यात येत आहे.




