तोपर्यंत काँग्रेस निवडून येणार नाही
बिहारच्या निकालानंतर फडणवीसांची विरोधकांवर सडकून टीका

नवी दिल्ली/14 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. एनडीए वि. महागठबंधन अशा दोघांमध्ये रंगलेल्या लढतीत आता बिहारमध्ये एनडीएची सत्ता आली आहे. कारण, बिहारच्या मतदारांनी भाजपा आणि जदयूसोबतच त्यांच्या सहकारी पक्षांना एकहाती सत्ता देऊ केली आहे.
याबाबत आता महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेत्यांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली असतानाच, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानत या निवडणुकीतील भाजपाच्या विजयाचा आनंद व्यक्त केला आहे. तसेच, त्यांनी काँग्रेसवर आणि त्यांच्या सहकारी पक्षांवर सुद्धा हल्लाबोल केला आहे. जोपर्यंत काँग्रेस संवैधानिक संस्थांवर आरोप करणे थांबवत नाही, तोपर्यंत त्यांचा विजय होणार नाही, असे मुख्यमंत्री फडण वीसांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथून शुक्रवारी (ता. 14 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मी भाजपा आणि एनडीए या सर्व घटक पक्षांच्या बिहार युनिटचे मनापासून अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचे अभिनंदन करून आभार मानतो. बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेऊन प्रचंड बहुमत दिलेले आहे. जे आकडे दिसत आहेत, त्यावरुन 2010 चा रेकॉर्ड तुटेल असा हा विजय झालेला आहे. मोदींवर बिहारच्या जनतेचे असलेले प्रेम आपल्याला दिसून येत आहे. नितीश कुमार, चिराग पासवान असतील मांझी असतील, उपेंद्र कुशवाह यांच्यासह युतीला लोकांनी प्रतिसाद दिला, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी आनंद व्यक्त केला.तर, यावेळी फडणवीसांनी काँग्रेससह विरोधकांना लक्ष्य करत म्हटले की, काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार सुरू केला आहे, त्याला जनतेने उत्तर दिले आहे. संवैधानिक संस्थांवर आरोप करणे, संवैधानिक मार्गाने चालणार्या कारभाराला विरोध करणे, जनतेच्या मताधिक्याला विरोध करणे. जोपर्यंत राहुल गांधी अशाप्रकारे संवैधानिक संस्थांवर आरोप करतील, तोपर्यंत काँग्रेसची हालत अशीच राहिल. काँग्रेसची हालत एमआयएमपेक्षाही खराब झाली आहे.




